मुंबई – आयपीएल स्पर्धेत श्रीलंकेच्या कोणत्याही खेळाडूवर बंदी लावण्यात येणार नाही, असा खुलासा बीसीसीआयने केला आहे. यंदाच्या स्पर्धेतील सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये श्रीलंकेचे खेळाडू खेळू शकणार नसल्याने बीसीसीआय त्यांच्यावर बंदी घालणार, असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यावर बीसीसीआयने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
श्रीलंका संघ सध्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत व्यस्त आहे, त्यामुळे त्यांचे जे खेळाडू आयपीएल स्पर्धेतील काही संघातून खेळणार आहेत, त्यांना सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकावे लागणार आहे. यावरूनच या खेळाडूंबाबत संघ मालक व बीसीसीआय नाराज असून या खेळाडूंवर संपूर्ण मोसमासाठीच बंदी लावली जाणार, असे वृत्त पसरले होते. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत श्रीलंकेचे एकूण चार खेळाडू विविध संघांकडून खेळणार आहेत.
वनिंदू हसरंगा (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू), महिश तक्षाना व मथिशा पाथिराना (दोन्ही चेन्नई सुपर किंग्ज) हे आयपीएलच्या पहिल्या काही सामन्यांसाठी उपलब्ध होणार नाहीत. या तिघांव्यतिरिक्त भानुका राजपक्षे पंजाब किंग्जकडून खेळणार आहे. तो मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत खेळत नसल्याने संपूर्ण आयपीएलसाठी उपलब्ध आहे.
दक्षिण आफ्रिकेबाबतही हाच मुद्दा
दक्षिण आफ्रिका संघाचेही काही खेळाडू सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. 31 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीत त्यांची नेदरलॅंड्सशी मालिका होत आहे. त्यांचे डेव्हिड मिलर, कागिसो रबाडा, क्वांटन डी कॉक, एनरिच नोर्जे, लुंगी एन्जीडी हे आयपीएलच्या पहिल्या काही सामन्यांत खेळू शकणार नाहीत.