लखनौ – उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील समाजवादी पार्टीचे खासदार प्रवीण कुमार निशाद यांने आज भाजपामध्ये प्रवेश केला. केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत निशाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
दोनच दिवसांपूर्वी निशाद यांनी सपा-बसपा आघाडीतून बाहेर पडल्याचे जाहीर केले होते. तेंव्हाच ते भाजपामध्ये जाणार असल्याचे बोलले जाऊ लागले होते. त्यांनी भाजप मध्ये जाणे हा “घाट्याचा सौदा’ असल्याची टीका सपाचे नेते अखिलेश यादव यांनी केली आहे. निशाद यांनी केलेल्या पक्षांतरामागे आर्थिक देवाण घेवाण झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
गोरखपूर मठाचे मठाधिपती असलेले योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारताना गोरखपूरच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर गेल्या वर्षी पोटनिवडणूकीमध्ये निशाद यांचा विजय झाला होता. निशाद पार्टी या नावाने प्रवीण कुमार निशाद यांनी स्वतःच्या राजकीय पक्षाची स्थापना केली होती. या पोटनिवडनूकीसाठी सपा आणि बसपाने निशाद यांना पाठिंबा दिला होता. त्यांना ही निवडणूक निशाद पार्टीच्या चिन्हावर लढायची होती. पण त्यांनी ही पोटनिवडणूक सपाच्या तिकीटावर लढवली होती. तेंव्हापासून सपा आणि निशाद पार्टीत मतभेद व्हायला लागले होते.
जनतेने सपा-बसपा आघाडीला मतदान केले होते. प्रवीण कुमार निशाद यांना मतदान केले नव्हते, अशी टीकाही अखिलेश यादव यांनी केली.