लखनौ: उत्तरप्रदेशात जमीनीच्या वादातून एका गावच्या सरपंचाचा पती आणि त्यांच्या मुलाची कॅमेऱ्यासमोर गोळ्या घालून हत्या करण्याचा प्रकार घडला आहे. देशभर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यातुन मोठी खळबळ उडाली आहे. संबळ जिल्ह्यातील एका शमसोई गावात हा प्रकार झाला. हे ठिकाण लखनौपासून 187 किमी अंतरावर आहे. यात ठार झालेला इसम समाजवादी पक्षाचा स्थानिक नेता आहे.
मनरेगा योजनेतून बांधण्यात येणारा रस्ता कोणत्या शेतातून बांधायचा यावरून हा वाद झाला.समाजवादी पक्षाचे नेते छोटेलाल दिवाकर, आणि त्यांचे पुत्र सुनिल हे त्या ठिकाणी जमीनीची पहाणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांची तेथे उपस्थित असलेल्या दोन स्थानिक बंदुकधाऱ्यांशी भांडणे झाली. त्यातून त्यांनी छोटेलाल आणि त्यांचा पुत्र सुनिल या दोघांना गोळ्या घालून ठार केले.
विशेष म्हणजे या साऱ्याप्रकाराचे चित्रीकरण झाले असून ते सोशल मिडीयावरही व्हायरल झाले आहे. दिवाकर यांची पत्नी या गावची सरपंच आहे. यातील हत्या करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली असून तो याच गावातील एक गुंड आहे. त्याच्या दुसऱ्या साथीदाराची ओळख अद्याप पटलेली नाही. हे दोघेही अद्याप फरारी आहेत. त्यांना शोधण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे.