क्वेट्टा – पाकिस्तानच्या दक्षिण-पश्चिम भागात तेथील तेल व गॅस उत्पादन प्रकल्पावर बंदोबस्तास असलेल्या पाकिस्तानी लष्कराच्या एका तुकडीवर हल्लेखोरांनी हल्ला करून सहा जवानांना ठार मारल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात चार जवान गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री बलुचिस्तानातील पीर घैब भागात हा हल्ला झाला.हल्लेखोरांनी रिमोट कंट्रोलद्वारे पेरून ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट घडवला. तसेच नंतर त्यांनी रायफलींनी त्यांच्यावर गोळीबार केला.
हा हल्ला कोणी केला याचा कयास लावला जात आहे; पण प्राथमिक माहितीनुसार, युनायटेड बलूच आर्मीने हा हल्ला केला असावा, असे मानले जात आहे. आज उशिरा याच संघटनेने याची जबाबदारी स्वीकारली. या महिन्याच्या सुरुवातीला याच संघटनेच्या गनिमांनी इराण सीमेलगत रिमोट कंट्रोलद्वारे बॉम्बस्फोट घडवत सहा जवानांना ठार मारले होते.
ठार झालेल्यांमध्ये एका मेजर दर्जाच्या अधिकाऱ्याचाही समावेश होता. गेल्या काही दिवसांपासून बलुचिस्तानच्या गनिमी संघटनांनी नैसर्गिक साधनसंपत्तीत या प्रांताला अधिक वाटा मिळावा, या मागणीसाठी काही प्रमाणात हिंसक कारवाया सुरू केल्या आहेत. याचे प्रमाण कमी असले तरी त्याची धग दिवसेंदिवस वाढत असल्याने पाकिस्तानसाठी ही एक मोठी डोकेदुखी ठरू लागली आहे.