विडंबन : “पॅकेज’चा विक्रम

राजा विक्रमादित्याने प्रजेच्या हितासाठी दररोज नवनवीन घोषणांचा पाऊस पाडण्याचा संकल्प केला व पहिली घोषणा करून स्टुडियो बाहेर पडला. सवयीप्रमाणे उद्याच्या कार्यक्रमांचे नियोजन करीत भरभर चालत राजमहालाकडे वळला. परंपरेनुसार वेताळ हा एखाद्या पत्रकाराप्रमाणे गाठणार असा विचार येतो ना येतो तोच वेताळ राजाच्या खांद्यावर येऊन बसला व हसायला लागला…!

“का हसतोस वेताळा? जगभरात एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे आणि तू चक्‍क हसतोस?’
“राजा, तुझासारखे कणखर नेतृत्व असताना व जो सतत जनतेच्या भल्याचा विचार करतो असा राजा असताना काळजी कशाला?’

“वेताळा, आज काही वेगळाच सूर आहे, काही चुकलं का?’
“राजा, आज विरोधक अचानक बोलू लागले, जे गेले 40-50 दिवस क्‍वारंटाइन केल्यासारखे मूग गिळून बसले होते बघ. हा विचार केला कधी?’
“का वेताळा? तूच सांग आता, तुला काय जाणवलं ते.’

“राजा, प्रत्येक लॉकडाऊनला तू निरनिराळे आवाहन केले, जनतेला एकजूट दाखवण्यास प्रवृत्त केले, निरनिराळे उपक्रम राबवले, मात्र विरोधकांनी काय केले?
“काय वेताळा?’

“फक्‍त टर उडविली, सोशल मीडियावर ट्रोल केले, जणू त्यांचा सहभाग नाही की जबाबदारी नाही… मात्र, या चौथ्या लॉकडाऊनवेळी सारे गंभीर झाले. जो तो प्रतिक्रिया देतो आहे, कुणी तारीफ करीत आहे तर कुणी सल्ले देत आहे. काय बदल झाला सांग बरं, राजा.’

“ऐक वेताळा. तुला काय वाटतं मी एवढा राज्यकारभार चालवतो आणि तरी मी दूधखुळा आहे? अरे, तीन लॉकडाऊन वेळी मी केवळ ज्ञान दिले, मार्गदर्शन केले. मेणबत्ती लाव, थाळी वाजव, नऊ मिनिटे लाइट बंद करायला सांगितले. यात विरोधकांना रस कसा असणार? पण आज चौथ्या लॉकडाऊन वेळी मी वीस लाख कोटी रुपयांची नुसती घोषणा केली आणि कान मोठे झाले सर्वांचे.’ सर्व कसे मैदानात उतरले.’
“बरोबर ओळखले राजा विक्रमा… वा राजा वा, जिंकलंस रे. पण तरीही…!’

“पण काय वेताळा…?’
“राजा तू शोले पाहिलास? त्यात ठाकूर जय व वीरूला तिजोरी उघडून दाखवतो व म्हणतो, “मैने तुम्हे यहां बुलाकर कोई गलती नहीं की.’ त्यावर वीरू म्हणतो, “एक गलती कर दी ठाकूर साब, हमें तिजोरी खोल कर बता दी. राजा तसेच तू पण एवढा मोठा आकडा सांगून गलती तो नहीं की? हा हा हा…!’
राजा विक्रमादित्य क्रोधाने लालबुंद होतो व तलवारीला हात घालतो, वेताळ थरथर कापू लागतो.
“काय चुकले राजा माझे.’

“वेताळा, बाकी सगळं ठीक होते, पण तू मला ठाकूर म्हटलाच कसा?’
राजाचा अवतार बघून वेताळ टूणकन उडी मारतो व शेजारील झाडावर चढून लोंबकळू लागतो.

– धनंजय एकबोटे

 

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.