नवी दिल्ली – गेल्याच आठवड्यात किरकोळ किमतीवर आधारित महागाई वाढल्याची आकडेवारी जाहीर झाली असताना आज घाऊक किमतीवर आधारित महागाईचा दरही वाढला असल्याची माहिती समोर आली आहे.
जागतिक पातळीवरही महागाई वाढत असल्यामुळे आता रिझर्व बॅंक आणि अर्थ मंत्रालयाला महागाई आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. महागाईच्या आकडेवारीबाबत वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे की, ऑक्टोबर महिन्यात घाऊक महागाईचा दर वाढून 12.54 टक्के इतका झाला आहे. गेल्या सात महिन्यांपासून या महागाईचा दर 10 टक्क्यापेक्षा जास्त आहे. आक्टोबर महिन्यात या महागाईचा दर केवळ 1.31 टक्के होता.
खनिजे, कच्चे तेल, धातू, अन्नधान्य, नैसर्गिक वायू, रसायने इत्यादीच्या दरात वाढ होत असल्यामुळे त्याचा एकूण महागाईवर परिणाम होत आहे. ऑक्टोबर महिन्यात उत्पादित वस्तूंच्या किमती जवळजवळ 12 टक्क्यांनी वाढल्या आहेत. महागाई वाढण्याची शक्यता असल्यामुळे केंद्र सरकारने गेल्या पंधरवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये भरपूर कपात केले आहे.
मात्र तरीही महागाईचा दर उच्च पातळीवर आहे. त्यामुळे तो कमी होण्यास बराच कालावधी लागू शकेल. दरम्यानच्या काळामध्ये जागतिक बाजारांमध्ये क्रुडचे दर वाढले तर भारताला अनेक अडचणीचा सामना करावा लागू शकता. इक्रा या पतमानांकन संस्थेच्या अर्थतज्ञ आदिती नायर यांनी सांगितले की, घाऊक महागाई वाढल्यामुळे आगामी काळात कंपन्यांना महाग कच्चा माल विकत घ्यावा लागेल. दरम्यानच्या काळामध्ये मागणी वाढण्याची शक्यता आहे. मात्र महाग पक्क्या मालामुळे या मागणीला मर्यादा असतील.