पुणे –राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विविध आगारांमध्ये हजारो बसेस “मेटेनन्स’ अभावी गेली पाच महिने जागेवर उभ्या होत्या. परिणामी, अनेक बसेसमध्ये तांत्रिक बिघाड, इंजिन, बॅटरी आदीमध्ये बिघाड झालेला आहे. त्यामुळे पद्मावती येथील उड्डाणपुलावर एसटीचा ब्रेक फेल होऊन झालेल्या अपघातानंतर देखभाल दुरुस्तीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. एसटी प्रशासनाचे वाहनांबाबतचे दुर्लक्ष प्रवाशांवर जीवावर बेतणार का? असा प्रश्न या अपघातानंतर उपस्थित होत असून सर्व एसटी बसेसची देखभाल, दुरस्ती तातडीने करणे गरजेचे ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान, कात्रज ते स्वारगेटच्या मुख्य रस्त्यावर कायमच वाहनांची वर्दळ असते. गुरूवारी सकाळी साडेअकराच्या दरम्यान देखील वाहनांची रहदारी होती. यातच पद्मावती येथे शंकर महाराज उड्डाणपुलाच्या उतरावर बस सावकाश येण्याऐवजी वेगाने आलेल्या एसटीने दुचाकी आणि चारचाकी वाहनांना धडक दिली. काही क्षणातच नागरिकांचा गोंधळ आणि वाहनांच्या काचा सर्वत्र पसरल्या. बस नियंत्रणाबाहेर असल्याने झालेल्या या अपघातामुळे प्रवाशांसह आसपासच्या नागरिकांच्या काळजाचा “ठोका’ चुकला.
पद्मावती येथील शंकर महाराज उड्डाणपूल संपताना साताऱ्याहून स्वारगेटला जाणाऱ्या एसटीचा अपघात झाला. यामध्ये तीन दुचाकी आणि एका चारचाकीला एसटीची धडक बसली. यामध्ये सर्व वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील झाले. दरम्यान, अपघातामुळे झालेली नागरिकांची गर्दी, दुतर्फा बघ्यांची गर्दी यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली होती. कात्रजच्या परिसरातील रस्ते “ब्लॉक’ झाले होते.
सातारा ते पुणे मार्गावरील ही बस होती. यामध्ये 43 प्रवासी होते. बसचे ब्रेक फेल झाले असल्याचा प्राथमिक अंदाज असून बस चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेल्याने अपघात झाला असावा. विभागाकडून करण्यात पुढील तपासानंतर अपघाताचे कारण स्पष्ट होईल.
– सचिन शिंदे, आगार व्यवस्थापक, स्वारगेट आगार
“सिग्नल’मुळे अधिक धडकी
उड्डाणपूल संपल्यानंतर लगेचच पद्मावती चौकामध्ये सिग्नल आहे. त्यामुळे उड्डाणपुलावरुन वेगाने येणाऱ्या वाहनांना वेग कमी करत सिग्नल उभे राहावे लागते. यासह मुख्य रस्ता, उड्डाणपुलावरुन येणारी वाहने, पद्मावतीकडे वळणारी वाहने यामध्ये अनेकदा गोंधळ होत असून, किरकोळ अपघात आणि वाहनचालकांमध्ये वादावादी होत असल्याचे स्थानिक सांगतात.
अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी…
पद्मावती येथे झालेल्या अपघातानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास पुणे विभागाचे अधिकारी दीपक घोडे, स्वारगेटचे आगार व्यवस्थापक सचिन शिंदे यांसह एसटीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. बस नियंत्रणाबाहेर गेल्याने अपघात घडल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी पाहणीदरम्यान वर्तवली.