सातारा – सातारा पालिकेच्या सोनगाव (ता. सातारा) येथे स्वमालकीच्या कचरा डेपोमध्ये “ट्रायल अँड एरर’ पद्धतीने कामकाज सुरू आहे. कचरा डेपोच्या हस्तांतरणाचा कोणताही आदेश नसताना, पुणे येथील ठेकेदाराला ही जागा देण्यात आली आहे. सध्या या डेपोमध्ये कचरा विलगीकरणापेक्षा भंगार विक्री फोफावल्याचे दिसत आहे.
सातारा पालिकेवर प्रशासक म्हणून अभिजित बापट यांचा कार्यकाळ तब्बल 14 महिन्यांहून अधिक झाला आहे. या काळात विकासाच्या अनेक कामांना प्रशासक म्हणून त्यांनीच मान्यता दिली आहे. सातारा पालिकेच्या मालकीचा सोनगाव कचरा डेपो सध्या पुणे येथील एका ठेकेदाराला देण्यात आला आहे.
सुरुवातीला या कचरा डेपोमध्ये बायोमायनिंग प्रकल्प राबवण्यात आला होता. या प्रकल्पाची बिले पूर्णपणे अदा झाल्यानंतरही बायोमायनिंगचे किती टन खत उपलब्ध झाले, हे सातारकरांना आजपर्यंत समजलेले नाही. आता कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प प्रस्तावित असताना, कचरा विलगीकरणाचे काम सुरू झाले आहे; परंतु याबाबत माहिती घेतली असता, प्रत्यक्षात कचरा विलगीकरणापेक्षा त्यातील भंगार बाजूला करून, ते पालिकेच्या परस्पर बाहेर विकण्याचा फंडा सुरू आहे. यामध्ये एका राजकीय पदाधिकाऱ्याने आपले खास वजन वापरून या भंगार विक्रीत अप्रत्यक्षरीत्या भागीदारी केल्याची चर्चा आहे.
कचरावेचक महिलांना तेथील किरकोळ भंगार गोळा करून, ते विकायचा व्यवसाय उपलब्ध असताना, संबंधित ठेकेदाराने त्यांना मनाई केली आहे. हा कचरा डेपो सातारकरांसाठी असून, ते स्वच्छताकरही भरतात. असे असताना कोणत्याही कराराशिवाय ठेकेदाराला तेथील ठेका परस्पर देऊन, डेपोतील भंगार परस्पर विकण्याचा अधिकार कोणी दिला, असा प्रश्न काही माजी नगरसेवकांनी केला आहे. सध्या या डेपोच्या संरक्षक भिंतीच्या कचरा बाहेर टाकला जात असल्याने रस्त्यावर अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे.