पुणे –शहरात एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच उन्हाचा चटका चांगलाच जाणवू लागला आहे. मागील काही दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे गेला होता. मात्र शुक्रवारी पुण्याचा पारा 38.7 अंशांवर होता. त्यामुळे नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.
मागील 24 तासांत कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. तर विदर्भात हवामान कोरडे होते. तर 10 एप्रिलला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मार्च महिन्यात शहरातील कमाल तापमान 38 अंशांपेक्षा अधिक झाले होते. तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हा पारा 40 अंशांवर पोहोचला होता. शुक्रवारी दिवसभर उन्हाचा चटका कायम असला तरी, कमाल तापमानात मात्र तुलनेने घट झाली आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरात 10 एप्रिल रोजी आकाश मुख्यत: निरभ्र राहून, दुपारी/ सायंकाळी अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर त्यानंतर दोन दिवस आकाश मुख्यत: निरभ्र राहणार आहे. या दरम्यान, कमाल तापमान 39 ते 41 अंशांदरम्यान राहण्याची शक्यता विभागाने वर्तवली आहे.