कोरेगाव – कोरेगाव तालुक्यात महसूल विभागाकडील जनतेचे प्रलंबित प्रश्न प्राधान्याने मार्गी लावावेत, अशी सूचना माजी मंत्री व विद्यमान आमदार शशिकांत शिंदे यांनी केली.
आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत तहसीलदार डॉ. संगमेश कोडे यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. राज्य सरकारने आणलेली ई-ऑफिस प्रणाली अद्याप पूर्णपणे कार्यान्वित झाली नसल्याने जनतेचे प्रश्न प्रलंबित रहात आहेत. कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि फिरतीवर असलेले क्षेत्र अधिकारी आणि कर्मचार्यांमध्ये समन्वय ठेवून जनतेचे प्रश्न सोडवावेत, अशी सूचना आमदार शिंदे यांनी केली.
कोरेगाव तहसीलदार कार्यालयात दैनंदिन कामाचा निपटारा केला जात आहे. कोणतेही काम प्रलंबित रहात नाही. तांत्रिक अडचण अथवा त्रुटी असल्यास विषय अपूर्ण राहतो. मात्र, सर्वसामान्यांचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावले जात असल्याचे डॉ. कोडे यांनी सांगितले. यावेळी रमेश उबाळे, केशव देशमुख, दिनेश सणस उपस्थित होते.