पुणे – अयोध्येतील राम मंदिरात श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात डॉ. कुमार विश्वास यांच्या अमोघ वाणीतील अपने अपने राम या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी सर परशूरामभाऊ महाविद्यालय येथील रामनगरी सज्ज झाली आहे.
संस्कृती प्रतिष्ठान आणि शि. प्र. मंडळीतर्फे गुरुवारपासून (दि. १८) तीन दिवस सायंकाळी ६ ते ९ या वेळेत रामकथेचे आयोजन केले आहे, अशी माहिती संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, माजी महापौर, भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. सायंकाळी ५ वाजता होणार्या रामकथेच्या उद्घाटनावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, कार्यवाह सचिन भोसले, शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष अॅड. एस. के. जैन, भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, ह.भ.प. पंकज महाराज गावडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. त्यानंतर, दि. २२ जानेवारी रोजी याच ठिकाणी लेझर शो, आतिषबाजी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमही होणार असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.