पुणे – शेतीसाठी लागणारी वीज हा महत्त्वाचा घटक असून, आज कित्येक शेतकरी विजेवर अवलंबून आहे. मात्र, शेतकऱ्यांसाठी पाण्यापासून निर्माण होणारी अथवा औष्णिक वीज उपलब्ध करून देण्यापेक्षा सौरऊर्जेवर आधारित वीजेचा पर्याय उपलब्ध केल्यास ती सर्वाधिक उपयुक्त ठरेल. सोलार फार्मिंगची एक अनोखी संकल्पना सौरऊर्जा उपकरणनिर्मिती क्षेत्रातील तज्ज्ञांकडून मांडण्यात आली.
महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्यावतीने सोलर एक्स्पोचे आयोजन केले आहे. असोसियेशनचे अध्यक्ष प्रदीप कुलकर्णी, माजी अध्यक्ष संजय कुलकर्णी, सचिव नरेंद्र पवार, खजिनदार राजेश मुथा, उपाध्यक्ष अनिल बैकेरीकर, संजय देशमुख उपस्थित या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
सौरऊर्जेवर चालणारे सोलर वॉटर हिटर, सोलर ड्रायर, सोलर रेफ्रिजरेटर, सोलर कुलर जनरेटर, इन्व्हर्टर याबरोबरच विविध उपकरणे पाहण्यासाठी पुणेकरांनी पहिल्याच दिवशी मोठी गर्दी केली होती. दोन दिवसीय प्रदर्शन हे रविवारपर्यंत असणार आहे. तब्बल 40 हून अधिक सौरऊर्जा उपकरण उत्पादकांची उत्पादने याठिकाणी प्रदर्शनात विक्रीसाठी आहेत. यामध्ये छोट्यात छोट्या वस्तूपासून ते मोठ्या उद्योजकांना लागणारी उपकरणे आहेत. सौरऊर्जा उपकरणांविषयीची विक्रीची जास्त दुकाने नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक ते लघु मध्यम उद्योजक यांना विविध उपकरणे खरेदी करण्यासाठी या प्रदर्शनाचा फायदा होणार आहे.