सोलापूर : कोरोनाचा वाढता विळखा पाहता सोलापूर जिल्ह्यात तीन दिवस संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या सर्व हद्दी बंद केल्या जाणार आहेत. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी हे आदेश दिले आहेत. सोलापूरमध्ये आज दुपारी 2 पासून 23 एप्रिल रात्री 12 पर्यंत संपूर्ण संचार बंदी असेल. याकाळात जीवनावश्यक सेवा, मेडिकल आणि दूध वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहे. किराणा, भाजी, फळे काहीही सुरु राहणार नाही.
आदेश आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. “सोलापूर शहरामध्ये कोरोनाची लागण होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून सोलापूर शहरामध्ये संपूर्ण संचारबंदी लागू करुन शहराच्या सर्व हद्दी बंद करणे आवश्यक आहे. त्यामुळे 20 एप्रिल 2020 दुपारी 2 पासून 23 एप्रिल 2020 रात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण संचारबंदी लागू करुन शहरातील सर्व दुकानं आणि शहराच्या सर्व हद्दी बंद करण्यात येत आहे,” असं जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकात म्हटलं आहे.