वडगाव मावळ, (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्याबाबत शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री विजय शिवतारे हे बेताल वक्तव्य करीत आहेत. याबाबत त्यांनी अजित पवार यांची माफी मागितली पाहिजे. जर त्यांनी माफी मागितली नाही तर आम्ही शिवसेना शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार करणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांनीपत्रकार परिषदेत दिला आहे.
यावेळी दीपाली गराडे, साहेबराव कारणे, किशोर सातकर, सुनील भोंगाडे, सुनील ढोरे, शिवाजी असवले यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना गणेश खांडगे म्हणाले की, शिंदे गटाचे पुरंधरमधील नेते विजय शिवतारे हे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत बेताल वक्तव्य करीत आहेत.
आमच्या नेत्यांनी महायुतीचा धर्म पाळण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आम्ही युतीचे काम करणार आहोत. मात्र आमच्या नेत्याचा अपमान झाल्यास तो सहन करणार नाही. शिवतारे यांनी जर माफी मागितली नाही तर आम्ही मावळ तालुक्यातील राष्टवादी कॉंग्रेसचा एकही कार्यकर्ता शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार करणार नाही.
आम्हाला मुळशी जवळ आहे
जर विजय शिवतारे यांनी माफी मागितली नाही तर शिंदे गटातील उमेदवाराच्या प्रचाराचे काम राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते करणार नाही. मुळशी तालुका हा बारामती लोकसभा क्षेत्रात येतो. आम्हाला मुळशी जवळ असल्याने आम्ही सर्वजण मुळशी तालुक्यात जाऊन सुनेत्रा पवार यांचा प्रचार करू, असा इशारा राष्ट्रवादीचे मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांनी दिला आहे.
काही दिवसांपूर्वी भाजपच्या मावळ तालुक्यातील पदाधिकारी यांनी बैठक घेत माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली. तसेच आमच्यावर श्रीरंग बारणे हे उमेदवार म्हणून लादले तर आम्ही प्रचार करणार नाही, असा स्पष्ट इशारा पक्षश्रेष्ठींना दिला होता. तर आज राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही श्रीरंग बारणे यांचे काम न करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे बारणे यांच्या अडचणीत वाढ झाल्याची चर्चा मावळ तालुक्यात सुरू आहे.
मत द्यायचे की नाही हे जनता ठरवेल
खासदार श्रीरंग बारणे यांनी गेल्या दहा वर्षात मतदार संघात कोणता नवीन प्रकल्प आणला याचा अहवाल जनतेला द्यावा अन् मगच उमेदवारी मागावी, असे आव्हान आमदार सुनील शेळके यांनी केले होते. मात्र अद्याप बारणे यांनी अहवाल दिलाच नाही. तुम्ही कोणत्या आधारावर मत मागणार, अशी विचारणा केली असता राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष गणेश खांडगे म्हणाले की, आम्ही युतीचा धर्म मानून प्रचार करू. श्रीरंग बारणे यांना मत द्यायचे की नाही हे मतदार ठरवतील, असे खांडगे यांनी सांगितले.