मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे सध्या नाशिक-नगर दौऱ्यावर आहेत. पक्ष, संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने अमित ठाकरे यांचा हा दौरा महत्वाचा आहे. अमित ठाकरे यांच्या या दौऱ्यादरम्यान सिन्नर तालुक्यातील समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावर मोठा राडा झाला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
टोल नाक्यावर अमित ठाकरे यांचा अपमान झाल्याचा मनसे कार्यकर्त्यांचा आरोप आहे. खवळलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी थेट टोल नाकाच फोडला. सिन्नर टोल नाक्यावर अमित ठाकरे यांना अर्धातास तिष्ठत ठेवल्याचा आरोप होतोय. मात्र, यासर्व घटनेवर स्वतः अमित ठाकरे म्हणाले होते की, “साहेबांमुळे 65 टोलनाके बंद झाले, माझ्यामुळे आज अजून एक अॅड झाला….’ असं ते म्हणाले.
दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली होती. अश्यातच, मराठी अभिनेता आरोह वेलणकरने ट्वीट करत जोरदार टोला लगावला असल्याचं दिसून आलं आहे. सध्या अभिनेत्याचं हे ट्विट चांगलाच व्हायरल झालं आहे.
समाजातील अनेक घडामोडींवर तो ट्वीटच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतो. अमित ठाकरेंच्या टोलनाका प्रकरणानंतर आरोहने केलेलं ट्वीट चर्चेत आहे. “हा काय फालतूपणा आहे. म्हणून कोणी मत देत नाही…’ असं आरोहने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. त्याच्या या ट्वीटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.