जामखेड – तालुक्यातील खर्डा ग्रामपंचायतीचे विभाजन व्हावे, यासाठी आज सोमवारी घेण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत ग्रामपंचायतच्या सर्वच 17 सदस्यांनी पाठिंबा दिला असून ग्रामसभेचा महत्त्वाचा मुद्दा असणारा विभाजनाचा प्रश्न मार्गी लागला. सर्वानुमते ग्रामसभेत ठराव मंजूर करून सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. त्या तेरा सदस्यांनी देखील विभाजनाला पाठिंबा दिला आहे.
गावाचा योग्य प्रकारे विकास व्हावा, यासाठी ग्रामपंचायत विभाजनाचा मुद्दा हाती घेतला. त्यानुसार यापुर्वी झालेली ग्रामसभा व मासिक सभेत हा मुद्दा उचलून धरला होता. मात्र यास काही ग्रामपंचायत सदस्यांनी विरोध केल्याने रविवारी खर्डा गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. दि. 12 जुलै रोजी ग्रामसभा आयोजित केली होती. त्यावेळी गावातील तरुणांनी खर्डा ग्रामपंचायत विभाजनाचा ठराव अचानकपणे ग्रामसभेत मांडला. 17 ग्रामपंचायत सदस्यांपैकी 14 सदस्यांनी ठरावाला पाठिंबा असल्याचे सांगितले होते. यासंदर्भात 21 जुलै रोजी ग्रामपंचायत कार्यालयात मासिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी 16 ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. त्यापैकी सत्ताधारी गटाच्या सदस्यांनी निवडणुकीच्या एक वर्षे अगोदर खर्डा ग्रामपंचायत विभाजनाचा निर्णय घेण्याचा विषय बैठकीमध्ये मांडला. त्याला आठ ग्रामपंचायत सदस्यांनी ठरावाला विरोध केला. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांनी अचानक भूमिका बदलल्या कारणामुळे रविवारी खर्डा शहरातील युवक शेतकरी,व्यापाऱ्यांनी, शहर बंद ठेवले होते.
आज ग्रामसभेत या ग्रामस्थांच्या मागणीला 17 सदस्यांनी विभाजनाला पाठिंबा दिला व ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यावेळी 17 सदस्यांपैकी 13 सदस्य उपस्थित होते व 4 सदस्य गैरहजर होते. तरी या 13 सदस्यांनी एकमत जाहीर करून ग्रामपंचायत विभाजनाला पाठिंबा दिला. यावेळी ग्रामस्थांनी पाठिंबा जाहीर केल्यानंतर पत्रकारांचे व ग्रामपंचायत निर्णयाचे आभार व्यक्त केले. सर्वांनी सोबत राहून एकजुटीने खर्डा गावाचा विकास करण्याचा निर्णय केला.
ग्रामपंचायत विभाजनाला पाठिंबा होता. आज सर्व सदस्य सर्वानुमते ग्रामस्थांच्या मागणीनुसार ग्रामपंचायत विभाजनाला मंजुरी दिली आहे. ग्रामस्थांचा हा मुद्दा विकासासाठी होता. जर ग्रामस्थांना यापुढे ग्रामपंचायत विभाजन करण्याच्या बाबतीत अडचणी आल्या तर आ. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करून त्यांना योग्य ती मदत करेल व गावाचा सर्वांगीण विकास करेल.
– संजीवनी वैजनाथ पाटील
सरपंच