देशातील नंबरच दोनचे श्रीमंत देवस्थान असलेल्या साईबाबा संस्थानच्या दानपेटीत 13 महिन्यांत 398 कोटींपेक्षा अधिक विक्रमी दान जमा झाले असून या दरम्यान 1 कोटी 50 लाखांहून अधिक साईभक्तांनी साईबाबा समाधीचे दर्शन घेतले, अशी माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.
दरम्यान, थेट युरोपमधील एका साईभक्ताने बाबांना हिरेजडीत मुकुट अर्पण केला आहे. 368 ग्रॅम वजन असलेल्या हिरेजडीत सुवर्ण मुकुटाची किंमत जवळपास 28 लाख रुपये इतकी आहे.
किनारी सुबिर पटेल राहणार युरोप या साईभक्ताने हा मुकूट साई चरणी अर्पण केला आहे. अतीशय सुंदर नक्षीकाम केलेला मुकूट अर्पण केल्याची माहिती साई संस्थानचे प्रशासकीय मुख्य लेखाधिकारी कैलास खराडे यांनी दिली आहे.
देशातील नंबर एकचे तिर्थक्षेत्र तिरुपती बालाजी देवस्थानच्या तुलनेत साईबाबांच्या चरणी चाळीस टक्के दान जमा झाले आहे. तिरुपती बालाजी देवस्थानचे वार्षिक दान जवळपास एक हजार कोटी रुपयांच्या घरात असते. त्या तुलनेत देशात तिरुपतीनंतर शिर्डीच्या साईबाबांचा नंबर लागतो. हळूहळू या दानाचा आकडा वाढतच चालला आहे. यंदाच्या वर्षातील एवढे मोठे दान हा साईबाबा संस्थानच्या इतिहासात विक्रमच आहे.