खासगी रुग्णालयांतील नर्सची उपस्थिती बंधनकारक
विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांचा इशारा
पुणे – करोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी पुढील काळात नर्स, डॉक्टर आदींसह पॅरामेडिकल स्टाफची गरज भासणार आहे. अनेक नर्स गावी गेल्या आहेत. तसेच काहींनी काम करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे प्रशासनाने केरळ येथील संस्थेशी बोलणी सुरू केली आहे. आवश्यक स्टाफ उपलब्ध न झाल्यास अत्यावश्यक सुविधेवेळी वापरण्यात येणारा “मेस्मा’ अर्थात “महाराष्ट्रा इसेन्शियल सर्व्हिस मेन्टेनन्स ऍक्ट’ लागू करण्याचा विचार आहे. जर, पॅरामेडिकल स्टाफने कामावर येण्यास नकार दिला तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिला आहे.
डॉ. म्हैसेकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. जून-जुलैमध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रशासनाकडून तयारी सुरू केली आहे.
नुकत्याच झालेल्या खासगी रुग्णालयाच्या बैठकीमध्ये रुग्णालय चालकांनी अपुऱ्या मनुष्यबळाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर विभागीय आयुक्तांनी हा इशारा दिला. त्याचबरोबर ज्या नर्सेस परदेशातून आल्या आहेत. त्यांनी प्रशासनाला सहकार्य करून रुग्णालयात सेवा बजवावी, असे आवाहन केले आहे.