पारनेर – पारनेर तालुक्यातील जामगाव येथे 12 मे रोजी आलेल्या 65 वर्षीय व्यक्तीचा नगर येथे उपचारादरम्यान आज पहाटे पाचच्या सुमारास मृत्यू झाला. या व्यक्तीच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र या व्यक्तीच्या पत्नीचा स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला असून, त्याचा अहवाल काय येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जामगाव येथे नेरुळ (मुंबई) येथून 12 मे रोजी मृत व्यक्ती पत्नी, मुलगी व नातीसह आले होते. स्थानिक करोना ग्रामसुरक्षा समितीने त्यांना होम क्वारंटाईन केले होते. या व्यक्तीस मधुमेह, रक्दाब आदी व्याधी होत्या. सोमवारी (दि. 25) या व्यक्तीला अचानक त्रास जाणवू लागल्याने नगरमधील केडगाव येथील खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्रास अधिक जाणवू लागल्यामुळे या व्यक्तीस नगर येथील दुसऱ्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले.
त्यानंतर तेथून रात्री उशिरा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे या व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या व्यक्तीच्या पत्नीला सर्दी व खोकल्याचा त्रास जाणवत असल्याने तिचा स्त्राव तपासणीसाठी पुणे येथे पाठवण्यात आला आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यू नेमका कशाने झाला, हे स्पष्ट होणार आहे.