…तो मुझे फख्र महसूस होता है कि हम हिंदुस्तानी मुसलमान हैं : गुलाम नबी आझाद

गुलाम नबी आझाद यांनी मानले सभागृहाचे आभार

नवी दिल्ली – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह राज्यसभेतील चार सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. यावेळी निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य नेत्यांनी गुलाम नबी आझाद यांचे कौतुक करत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. आझाद यांनीही सर्वांचे आभार मानून राजकारणाचे काही अनुभव सांगितले.

महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि मौलाना आझाद यांच्याकडून देशभक्ती शिकली असल्याचे गुलाम नबी आझाद यांनी सांगितले. तसेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांच्यामुळेच मी इथपर्यंत पोहचलो आहे, असे म्हणत आझाद यांनी त्यांचे आभार मानले.

गुलाम नबी आझाद म्हणाले कि, मी त्या भाग्यवान लोकांपैकी आहे जे पाकिस्तानात गेले नाही. मी जेव्हा तेथील परिस्थितींबाबत वाचतो. तेव्हा मला भारतीय मुस्लिम असल्याचा अभिमान वाटतो. जगभरात जर कोणत्या मुसलमानाने अभिमान वाटायला पाहिजे, तर भारतातील मुस्लिम वाटायला हवा, असे भाष्य त्यांनी केले.

मागील ३०-३५ वर्षात अफगाणिस्तानपासून ते इराकपर्यंत आपण बघतोय की, कसे मुस्लिम एकमेकांसोबत लढत संपत चालले आहेत. तिथे तर हिंदू नाहीत. तिथे ख्रिश्चनही नाही. तिथे दुसरं कुणी लढत नाहीत. ते आपसातच लढत आहेत, असं गुलाम नबी आझाद म्हणाले.

मुख्यमंत्री झाल्यानंतर मी पहिली सभा सोपोर मध्ये घेतली होती. येथून गिलानी साहेब तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यावेळी मी म्हंटले, माझ्या सरकारमध्ये कोणताही मंत्री धर्म अथवा मस्जिद किंवा पक्षाच्या आधारे न्याय करेल तर मला त्यांच्यासोबत काम करताना लाज वाटेल, असेही गुलाम नबी आझाद यांनी म्हंटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.