…म्हणून १९ महिने अरुण जेटली होते जेलमध्ये 

माजी अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे आज निधन झाले. अरुण जेटली यांना श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे उपचाराकरीता दिल्लीतील एम्स (अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, त्यांची प्रकृती खालावतच गेली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अरुण जेटली यांची राजकीय कारकीर्द दमदार राहिली आहे. यादरम्यान त्यांच्या जीवनात असाही क्षण आला ज्यावेळी त्यांना १९ महिने जेलमध्ये राहावे लागले होते.

देशात १९७५ साली आणीबाणी लागू करण्यात आली होती. यावेळी अरुण जेटलींनी आणीबाणी विरोधात आवाज उठविला असल्याने त्यांना १९ महिने जेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांच्यासोबत अनेक विद्यार्थी नेते जेलमध्ये होते. जेलमध्ये जेटलींना अनेक बडे नेते भेटले. जेटलींच्या भाषणाच्या कलेचा अंदाज नेत्यांना फारच आवडला होता.

१९७३ रोजी जयप्रकाश नारायण आणि राजनारायण यांच्याद्वारे उभारण्यात आलेल्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात अरुण जेटली यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. यानंतर ते १९७४ साली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदमध्ये सहभागी झाले.

१९९१ साली जेटलींनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला. आणि १९९९ साली अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये त्यांची माहिती व प्रसारण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर जेटलींनी कायदा आणि न्याय मंत्रालयाचा कार्यभारही सांभाळला. नरेंद्र मोदी सरकारमध्ये अरुण जेटलींनी अर्थमंत्री पद सांभाळले होते. परंतु, त्यानंतर प्रकृतीच्या कारणास्तव जेटली राजकारणात सक्रिय नव्हते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)