पुणे : आतापर्यंत 205 गावांमधील 27 हजार 217 मिळकत धारकांना मिळकत पत्रिका प्रदान करण्यात आल्याची माहिती महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. नागरिकांना मिळकत पत्रिका मिळाल्यामुळे प्रत्येक धारकाच्या जागेचा नकाशा तयार होईल व सीमा निश्चित होऊन मिळकतीचे नेमके क्षेत्र समजेल. मालकी हक्काबाबत व हद्दीबाबत निर्माण होणारे वाद संपुष्टात येण्यास मदत होईल. याबरोबरच मिळकतीचे वाद देखील कमी होतील, असे सत्तार यांनी सांगितले.
राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन मिळकत पत्रिका वाटपाचा कार्यक्रम पार पडला. त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील 99 गावांमधील 13 हजार 500 मिळकत धारकांना ऑनलाईन मिळकत पत्रिका प्रदान करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जमाबंदी आयुक्त एन. के. सुधांशू, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक किशोर तवरेज व बाळासाहेब काळे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख राजेंद्र गोळे उपस्थित होते.
जमाबंदी आयुक्त एन. के. सुधांशू म्हणाले, राज्यातील गावठाण भूमापन न झालेल्या सर्व गावांचे गावठाणातील मिळकतीचे भूमापन करणार आहे. या मिळकत धारकांना मिळकत पत्रिका स्वरूपात अधिकार अभिलेख उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने
स्वामित्व योजना सुरू केली आहे. या योजने अंतर्गत देशभरातील गावांमधील ग्रामस्थांना मालकी हक्काच्या मिळकत पत्रिकेचे वितरण करण्यात येणार आहे.