बगदाद, दि. 25 – इराकमधील करोना रुग्णांवर उपचार सुरू असलेल्या एका रुग्णालयाला आज लागलेल्या भीषण आगीमध्ये तब्बल 82 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. या रुग्णालयात 110 रुग्ण उपचार घेत होते. शनिवारी रात्री झालेल्या या दुर्घटनेमागे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याची टीका केली जात आहे. ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागली, असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. घटनेनंतर लगेचच पंतप्रधानांनी अल खातिब या रुग्णालयातील प्रमुख अधिकाऱ्यांना तडकाफडकी कामावरून कमी केले आहे.
आगीत मरण पावलेल्या रुग्णांमध्ये व्हेंटिलेटरवर उपचार घेणाऱ्या 28 रुग्णांचा समावेश आहे. या सर्वांना करोना विषाणूचा गंभीर संसर्ग झालेला होता, असे देस्गातीक मानवी हक्क आयोगाचे प्रवक्ते अली अल बयाती यांनी सांगितले. आगीबाबतचे वृत्त समजल्यावर अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले. ही आग रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर लागली होती, नागरी संरक्षण पथकातील कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण आणले. रुग्णालयातील अन्य जखमींना आणि अन्य रुग्णांना इतरत्र हलवण्यात आले आहे. किमान 200 जणांना वाचवण्यात आले असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. घटनास्थळी रुग्णांचे नातेवाईकही जमा झाल्यामुळे परिस्थितीमध्ये अभूतपूर्व गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. घटनास्थळावरून डझनभर गंभीर भाजलेल्या रुग्णांना बाहेर काढण्यात आले आहे.
इराकमध्ये करोना विषाणूच्या साथीची दुसरी लाट सुरू असतानाच ही जळीतकांडाची घटना घडली आहे. इराकमध्ये सध्या दररोज सुमारे 8 हजार बाधितांची नोंद होते आहे. इराकमध्ये कोविड-19 ची साथ सुरू झाल्यापासूनची रुग्णांची ही सर्वाधिक संख्या आहे. इराकमध्ये आतापर्यंत 1 लाखापेक्षा अधिक जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे.