…तर जिल्हाधिकाऱ्यांविरुद्ध दाद मागणार – राजू शेट्टी

पुणे – राज्यातील साखर कारखान्यांनी उसाच्या थकीत “एफआरपी’प्रश्‍नी साखर आयुक्तांनी महसुली वसुली प्रमाणपत्रानुसार (आरआरसी) रक्कम न देणाऱ्या कारखान्यांवर जप्तीची कारवाई केली. मात्र, संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी त्याप्रमाणे शेतकऱ्यांना रक्कम वसूल करून दिलेली नाही. यामध्ये काही बड्या राजकीय पुढाऱ्यांचे कारखाने असल्यामुळे आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रस्त्यावरची लढाई लढण्याबरोबरच संबंधित जिल्हाधिकाऱ्यांविरुद्ध न्यायालयात दाद मागणार, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी दिला.

खासदार शेट्टी यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची सोमवारी भेट घेतली. यावेळी त्यांनी थकीत “एफआरपी’ची माहिती घेतली. याप्रसंगी सतीश काकडे, डॉ. योगेश पांडे, माणिक कदम, बापू कारंडे यांच्यासह अन्य शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना मंत्र्यांचे दुष्काळ दौरे हे दिखाउपणाचे असल्याची टीका खासदार शेट्टी यांनी यावेळी केली. तर सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांचे कारखाने शेतकऱ्यांची “एफआरपी’ची रक्कम देत नाहीत.

…तर मोदींविरुद्धही प्रचार

10 मेनंतर बिहार आणि उत्तरप्रदेश मधील शेतकरी संघटनांशी संबंधित उमेदवारांच्या प्रचाराला मी जाणार आहे. वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात मला प्रचारास बोलाविल्यास मी नक्की जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.