पुणे – एसटीच्या 45 हजार ई-तिकीट मशीन्स ‘ब्रेकडाऊन’

पुणे – हायटेकच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या एसटी महामंडळाला तांत्रिक समस्येचे ग्रहण लागले आहे. किमान आठ वर्षांपूर्वी कोट्यावधी रुपयांचा खर्च करुन खरेदी करण्यात आलेली तब्बल 45 हजार ई-तिकिट मशीन्स “ब्रेकडाऊन’ झाली आहेत, ही मशीन्स कामच करत नसल्याने आणि अचानक बंद पडत असल्याने वाहक त्रस्त झाले आहेत. त्याचा परिणाम कामावर आणि प्रवासी सेवेवर होत आहे, त्यासंदर्भात प्रशासनाने आगामी काळात निर्णय न घेतल्यास ही मशीन्स भंगारात काढण्याची वेळ महामंडळावर येणार आहे.

महामंडळाने “ट्रायमॅक्‍स’ कंपनीच्या 45 हजार ई- तिकिट मशीन्स खरेदी केल्या आहेत. या मशीन्स हाताळता याव्यात, यासाठी सर्व वाहकांसाठी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. पण, आता या मशीन्स हाताळताना वाहकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे प्रवाशांना तिकिटे देताना वाहकांना त्रास होत आहे. यासंदर्भात अनेक वाहकांनी संबंधित आगार प्रमुखांकडे तक्रारी केल्या होत्या, आगार प्रमुखांनी या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यामध्ये सत्यता असल्याचे महामंडळाच्याही निदर्शनास आले आहे. ही बाब लक्षात घेऊन महामंडळाने राज्यातील सर्व वाहकांना छापील तिकिटे दिली आहेत, त्यामुळे वाहकांना या मशीन्स आणि छापील तिकिटांचा ट्रे हे सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे आगामी काळात या मशीन्स न बदलल्यास या मशीन्स भंगारात काढाव्या लागतील, अशी शक्‍यता अनेक वाहकांनी “प्रभात’ शी बोलताना व्यक्त केल्या.

यासंदर्भात एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल म्हणाले, “या मशीन्सच्या संदर्भात महामंडळाकडे तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे यासंदर्भात तातडीने योग्य तो निर्णय घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला करण्यात आल्या आहेत.’

या आहेत मशीन्स मधील समस्या…!
* चार्जिंग असतानाही मशीन मध्येच बंद पडणे
* तिकिट अर्धवट निघणे
* मध्येच डिस्प्ले जाणे
* तिकिटावरील अक्षरे पुसट असणे
* मशीन्स मधील बिघाड न निघणे
* मराठीत तिकीट निघण्यास समस्या उद्‌भवणे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.