पॅरिस – पश्चिम अमेरिकेत कॅलिफोर्नियाच्या दक्षिणेला लागलेल्या किमान 2 अशा महाकाय वणव्यांमुळे आतापर्यंत 40 लाख एकरांवरील जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असून किमान 3.4 कोटी लोकांसाठी रेड अलर्ट लागू करण्यात आला आहे. या आगीत आतापर्यंत 32 जणांचा मृत्यू झाल्याचे सरकारचे म्हणणे आहे. इतकेच नव्हे, तर या वणव्यांमधून निर्माण झालेल्या धुराने उत्तर अमेरिकेसह युरोपावरही आक्रमण केल्याचे दिसून येत आहे. कोपर्निकस ऍटमॉसफिअर मॉनिटरिंग सिस्टीमने प्रसिद्ध केलेल्या ताज्या छायाचित्रांमध्ये हे धुराचे लोट उत्तर अमेरिकेतील पोर्टलॅंड, ओरेगॉन, व्हॅनकुव्हर आणि सॅन फ्रान्सिस्कोसह युरोपातील अनेक देशांवर या धुराचे काळे ढग आढळून आले आहेत.
अमेरिकी राज्य कॅलिफोर्निया सध्या वणव्याचा मुकाबला करत आहे. सुमारे 4 कोटी लोकसंख्येच्या राज्यात 22 ठिकाणी मोठा वणवा लागला आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाचे 4 हजारांवर जवान अव्याहत प्रयत्न करत आहेत.ही आग वनक्षेत्रातून ऑरेंज कौंटीच्या वसाहतीपर्यंत जाऊन पोहोचली असल्याचे समजते, जिथे घनदाट लोकवस्ती आहे. त्यामुळे एक लाख लोकांना घर सोडण्याची सूचना देण्यात आली आहे. बुधवारपर्यंत हजारांवर लोक सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आले. आतापर्यंत 6,600 एकरावरील वनक्षेत्र भस्मसात झाले असून येथे ताशी 60 ते 65 किमी वेगाने वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे आग विझवण्याचे सर्व प्रयत्न अपुरे पडत आहेत.