पुणे – करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्यातील शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची 50 टक्के उपस्थिती बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य शासनाने आज घेतला.
शाळा तुर्तास बंद राहतील. परंतु ऑनलाइन व ऑफलाइन शिक्षणासंबंधित कामकाजासाठी तत्काळ कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत.
करोनाचा शैक्षणिक संस्थांमध्ये फैलाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने शाळा सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. परंतु, विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी ऑनलाइन शिक्षणाला परवानगी दिली आहे.
विद्यार्थी विविध पर्यायाच्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. या कामकाजासाठी 50 टक्के शिक्षकांना शाळेत उपस्थित राहावे लागणार आहे. याबाबतचे परिपत्रक शासनाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी काढले.