पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- महाराष्ट्रातील औद्योगिक पट्टयात बेकायदेशीररित्या तयार होणारे मेफेड्रोन हे उच्च दर्जाचे मानले जाते. या मालास ब्रिटन, युरोप आणि कॅनडात प्रचंड मागणी आहे. हा माल दिल्ली किंवा दक्षिणेतील राज्यातून संबंधीत देशात पाठविला जातो. पुणे पोलिसांनी दिल्ली येथे पकडलेले ९७० किलो मेफेड्रोन हे लंडन येथे जाणार होते. यापूर्वी संबंधीत कंपनीतून तयार झालेला मालही लंडनला गेल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका टीपच्या आधारे आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेट उधवस्त केले. याच्या तपासात वेगवेगळ्या बाबी पुढे येत आहेत. पोलिसांनी ३६०० कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले. यातील सर्वाधिक मेफेड्रोन दिल्लीतील गोडावूनमधून जप्त केले गेले.
हा माल कुरिअरने लंडनला जाणार होता. मात्र, एका आरोपीच्या मुलाचे लग्न असल्याने तो पाठवण्यास थोडा विलंब झाला. यामुळे पोलिसांच्या हाती मोठे घबाड लागले. परंतु, काही किलो एमडी लंडनला रवाना झाल्याचे उघड झाले. याचा सुत्रधार संदीप धुनिया हा परदेशातील व्यवहार पहात होता.
राज्यात चोरी छुपे उत्पादीत होणाऱ्या मेफेड्रोनच्या मार्केटची पोलिसांनी माहिती घेतली असता. प्रामुख्याने राज्यात उत्पादीत झालेला माल युरोप, कॅनडा आणि ब्रिटन येथे विकला जातो. मुख्य आरोपी संदिप धुनियाकडे ब्रिटनचा पासपोर्ट आहे. इतकेच नव्हे तर त्याच्यावर तेथे देखील गुन्हे दाखल आहेत. त्याने सुरवातीला फुड पॅकेटस डिलिव्हरी व्यवसायात जम बसवला.
त्यानंतर फुड पॅकेटच्या माध्यमातूनच त्याने ड्रगची डिलिव्हरी परदेशात करण्यात सुरवात केली. ॲल्युमिनियमच्या जाड फॉइलमधून फुड टॅग लावून ते विमानाने पाठवले जात होते. यामुळे विमानतळावरील तपासणी ते आजवर सापडले नव्हते. तर, राज्यामध्ये तो मिठाच्या पुडयांच्या पाकिटाच्या मधोमध ड्रग ठेऊन त्याचे वितरण करत होता.
… असा चालतो बाजार
अंमली पदार्थ जप्ती प्रकरणाचा तपास करणाऱ्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दै. प्रभातला सांगितले की, सामान्यत: अफू, गांजा, चरस आणि कोकेन सारखी पारंपरिक वनस्पतीवर-आधारित ड्रग भारतात उत्तरेकडून दक्षिणेकडे जातात. तर दुसरीकडे, मेफेड्रोन (एमडी), मेथॅम्फेटामाइन (मेथ) आणि एक्स्टसी गोळ्या यासारखी कृत्रिम ड्रग देशात दक्षिणेकडून उत्तरेकडे विरुद्ध दिशेने पाठवली जातात. तेथून ती परदेशात रवाना केली जातात.