पालेकेल्ले – कर्णधार हरमनप्रीत कौर आणि पूजा वस्त्रकार यांनी केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला संघाने गुरुवारी मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेवर 39 धावांनी विजय नोंदविला. या विजयासह मालिका 3-0 अशी जिंकत श्रीलंकेला क्लीन स्वीप दिला. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत 255 धावा रचल्या होत्या. निर्धारित धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ केवळ 216 धावांवर संपुष्टात आला.
या सामन्यात श्रीलंकेने नाणफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताची सलामीवीर फलंदाज शफाली वर्माने तुफानी फलंदाजी करत 50 चेंडूत 49 धावा केल्या. यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने 88 चेंडूत 75 धावा केल्या आणि पूजा वस्त्रकारने 65 चेंडूत नाबाद 56 धावा करत भारताला 50 षटकांत 9 बाद 255 धावांपर्यंत पोहोचवले.
पूजा वस्त्राकरचा विश्वविक्रम
भारतीय महिला संघातील पूजा वस्त्राकरने आठव्या क्रमांकावर येऊन अर्धशतकी खेळी करत विश्वविक्रम नोंदविला आहे. पूजा ही आठव्या किंवा त्याखालील क्रमांकावर सर्वाधिक अर्धशतक झळकावणारी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. 22 वर्षीय पूजाने गुरुवारी श्रीलंकेविरुद्ध 65 चेंडूत 56 धावांची नाबाद खेळी खेळली. यादरम्यान त्याने तीन षटकारही मारले. आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना पूजाचे हे दुसरे अर्धशतक आहे. याशिवाय तिने नवव्या क्रमांकावर अर्धशतकही ठोकले आहे. पूजाने आता आठव्या क्रमांकावर किंवा त्याखालील तीन अर्धशतके केली आहेत, जो एक जागतिक विक्रम आहे. पूजापूर्वी हा विक्रम न्यूझीलंडच्या निकोल ब्राउनच्या नावावर होता, जिच्या नावावर दोन अर्धशतके आहेत.
या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंका संघाची सुरुवात अनपेक्षित झाली. केवळ 7 धावांवर भारतीय गोलंदाज मेघना सिंगने श्रीलंकेची सलामीवीर विश्मी गुनारत्नेला बाद करत संघाला पहिले यश मिळवून दिले. मात्र, त्यानंतर श्रीलंकेची कर्णधार चमारी अट्टापट्टूने डाव सावरत 44 धावांची संयमी खेळी केली, तर नीलाक्षी डिसिल्व्हाने केलेली नाबाद 48 धावांची खेळीही व्यर्थ ठरली. भारताकडून राजेश्वरी गायकवाडने सर्वाधिक 3 गडी बाद केले, तर पूजा वस्त्रकारने फलंदाजीनंतर गोलंदाजीत कमाल दाखवत 2 गडी बाद केले. त्यामुळेच पूजा वस्त्रकारला सामनावीर म्हणून जाहीर केले.
संक्षिप्त धावफलक
भारत : 50 षटकांत 9 बाद 255 (शफाली वर्मा 49, यास्तिका भाटिया 30, हरमनप्रीत कौर 75, पूजा वस्त्रकार नाबाद 56. रश्मी सिल्वा 2-53, चमारी अट्टापट्टू 2-45)
श्रीलंका : 47.3 षटकांत सर्वबाद 216 (चमारी अट्टापट्टू 44, हसिनी परेरा 39, हर्षिता समरविक्रम 22, नीलाक्षी डिसिल्व्हा नाबाद 48. राजेश्वरी गायकवाड 3-36, पूजा वस्त्रकार 2-33, मेघना सिंग 2-32)