मुंबई – जागतिक बाजारातून संमिश्र संकेत आले असतानाच बॅंका, धातु, आणि ग्राहक वस्तू क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची काही प्रमाणात विक्री झाल्यामुळे बुधवारी शेअर बाजाराच्या निर्देशांकात घसरण झाली.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 80 अंकांनी कमी होऊन 60,352 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक केवळ 27 अंकांनी म्हणजे 0.15 टक्क्यांनी कमी होऊन 18,017 अंकांवर बंद झाला.
जागतिक पातळीवर महागाई वाढण्याची शक्यता असल्यामुळे शेअर बाजारात संमिश्र वातावरण आहे. त्याचा परिणाम भारतीय बाजारावरही होत असल्याचे जिओची वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले. चीनमधील किरकोळ किमतीवर आधारित आणि घाऊक किमतीवर आधारित महागाई वाढली आहे.
अमेरिकेतही महागाई वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे देश ज्या इतर देशांना निर्यात करतात तेथे महागाई निर्यात होण्याची शक्यता असल्यामुळे जागतिक बाजारात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
आज शेअर बाजारात धातू, रिऍल्टी, ग्राहक वस्तू, बॅंका, ऊर्जा या क्षेत्राच्या कंपन्यांच्या शेअरची विक्री झाली. तर दूरसंचार, वाहन आणि आरोग्य क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ नोंदली गेली. छोट्या कंपन्यांच्या भावावर आधारित मिड कॅप आणि स्मॉल कॅप 0.50 टक्क्यांपर्यंत घसरले.