- दिवाळीनिमित्त सजली बाजारपेठ : करोनाचा बाजारावर प्रादुर्भाव
पिंपरी – दिवाळीनिमित्त शहरातील बाजारपेठा सजल्या आहेत. विविधरंगी आकाशकंदील लक्ष वेधून घेत आहे. दिवाळीसाठी आवश्यक खरेदीला सुरवात झाली आहे. गतवर्षीपेक्षा आकाशकंदिलांचे 30 टक्के “बुकींग’ कमी झाले आहे.
दिवाळी म्हटली की आनंदोत्सव, जल्लोष आणि उत्साहाला उधाण येते. दिवाळीच्या आधी घरोघरी फराळ बनवायला सुरवात होते. त्याचबरोबर आकाशकंदील, पणत्या आणि सजावट साहित्याची खरेदी केली जाते. दिवाळी आता अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपली आहे. शनिवार-रविवारपासूनच दिवाळीसाठी आवश्यक खरेदीला सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षी दिवाळीच्या खरेदीला महिनाभरापूर्वी सुरवात झाली होती. तर, यंदा करोना संसर्गाचा असलेला प्रादुर्भाव, देशभरात केलेला लॉकडाऊन या सर्वांचा परिणाम बाजारपेठेवर झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.
यंदा दिवाळीच्या 15 दिवस आधीपासून खरेदीला सुरवात झाली आहे.
अद्यापही बऱ्याच जणांचे दिवाळी बोनस झालेले नाही. त्यामुळे खरेदी करताना देखील आवश्यकतेनुसार कपडे व अन्य खरेदी केली जात आहे. आकाशकंदिलामध्ये मुख्यत्वे चांदणी, पारंपारिक चौकोनी, छोटे तसेच विविध आकारातील आकाशकंदील विक्रीसाठी आले आहेत. मोठे आकाशकंदील 100 रुपयांपासून 1 हजार रुपयांपर्यंत विकले जात आहेत. त्याशिवाय, दिवाळीनिमित्त आकर्षक तोरण, शुभ-लाभाचे स्टीकर विक्रीसाठी आले आहेत. तोरण हे 100 ते 700 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. तर, शुभ-लाभाचे स्टीकर 10 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत मिळत आहेत.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा आकाशकंदिलांना 30 टक्के मागणी कमी झाली आहे. नागरिकांकडून विचारपूर्वक आवश्यक वस्तूंचीच दिवाळीसाठी खरेदी केली जात आहे. करोनाचा नक्कीच बाजारपेठेवर परिणाम झाला आहे.
– सागर मनसुखानी, विक्रेते.