मुंबई – महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नावाची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही यादी राज्यपालांकडे सुपूर्द केली.
राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व शिवसेनेकडून प्रत्येकी चार जणांची शिफारस करण्यात आली असून या यादित दोन नावे विशेष आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर आज महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.
सायंकाळी 6 वाजता अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, परिवहन मंत्री अनिल परब आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. तिन्ही मंत्र्यांनी राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेवर पाठवायच्या उमेदवारांची यादी राज्यपालांकडे सोपवली.
वंचित बहुजन आघाडीकडून 2019ची लोकसभा निवडणूक लढलेले यशपाल भिंगे यांचे नाव राष्ट्रवादीकडून देण्यात आले आहे. तर वंचित बहुजन आघाडीकडून चंद्रपूर विधानसभा लढलेले अनिरुद्ध वनकर यांना कॉंग्रेसने संधी दिली. कला क्षेत्रातून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचे नाव शिवसेनेकडून, तर गायक आनंद शिंदे यांचे नाव राष्टवादी कॉंग्रेसने दिले आहे.
अनिल परब म्हणाले, राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी यादी राज्यपालांना दिली आहे. मुख्यमंत्र्यांचे पत्र आणि मंत्रिमंडळ ठराव यासह कायदेशीर बाबी नमूद करुन राज्यपालांना विनंती पत्र दिले आहे. सगळ्या कायदेशीर बाबींची पूर्तता करुन यादी सोपवली आहे. त्यामुळे राज्यपाल या यादीवर शिक्कामोर्तब करतील, असा विश्वास परब यांनी व्यक्त केला.
दरम्यान, राज्यपाल यादी मंजूर करतील की, नाही हा जर तरचा प्रश्न आहे. त्यावर आताच भाष्य करणे योग्य नाही. आम्ही सर्व बाबींची पूर्तता करून यादी दिली आहे. त्यामुळे राज्यपाल त्यावर शिक्कामोर्तब करतील अशी आशा आहे, अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली.
शिवसेना
1)उर्मिला मातोंडकर
2) नितीन बानगुडे-पाटील
3) विजय करंजकर
4) चंद्रकांत रघुवंशी
राष्ट्रवादी कॉंग्रेस
1) एकनाथ खडसे
2) राजू शेट्टी
3) यशपाल भिंगे – साहित्य
4) आनंद शिंदे – कला
कॉंग्रेस
1) सचिन सावंत
2) रजनी पाटील
3) मुजफ्फर हुसैन
4) अनिरुद्ध वणगे – कला