आत्मनिर्भरतेचे धडे : बांधकाम कामगार सेनेकडून 500 महिलांना प्रशिक्षण
– तुषार रंधवे
पुणे – लॉकडाऊनच्या काळात लाखो कामगार बेरोजगार झाले आहेत तर, अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. काहींच्या डोक्यावर वेतन कपातीची टांगती तलवार आहे, अशा परिस्थितीत गवंडीकाम करणाऱ्या महिलांना मिस्त्रीकाम व पेव्हिंग ब्लॉक तयार करण्याचे प्रशिक्षण देण्याचे काम बांधकाम कामगार सेनेने हाती घेतले आहे. या सर्व महिलांना प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी प्रशिक्षण दिले जात आहे. या माध्यमातून महिला आत्मनिर्भर होण्याचे धडे गिरवीत आहेत.
बांधकाम क्षेत्रात काम करणारे बहुतांशी मजूर कर्नाटक राज्यातील आहेत. लॉकडाऊनमुळे राज्यातील शेकडो बांधकाम प्रकल्प बंद पडले, हाताला काम नसल्याने लाखो मजुरांचे स्थलांतर झाले. त्यामुळे येथील शक्य तेवढ्या मजुरांवर बांधकामे सुरू झाली आहेत. परंतु, मिस्त्रीसारख्या कामाकरिता अनुभवी व कुशल कारागिराची कमतरता भासत आहे. नमेकी ही बाब हेरुन, बांधकाम कामगार सेनेच्यावतीने गवंडीकाम करणाऱ्या महिलांसाठी मिस्त्रीकामाबरोबरच पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. यातून अनुभवी व कुशल महिला मिस्त्री मिळू लागले आहेत. या प्रशिक्षित महिला कामगार फुटपाथवर सफाईदारपणे पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे काम करीत आहेत.
बांधकाम कामगार सेनेने या महिला कामगारांना ऑन जॉब ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली आहे. बांधकाम मालकांची भेट घेत, या महिलांचे कसब समजावून सांगत, त्यांना या कामासाठी प्रोत्साहन देण्याची विनंती केली जात आहे. त्याला बांधकाम क्षेत्रातमन सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. सध्या, 300 महिलांचे ट्रेनिंग सुरू आहे. या महिला कामगारांना गवंडी कामाची मिळणारी 400 रुपयांची हजेरी आता 800 ते 900 रुपयांवर पोहोचली आहे.
फिजिकल डिस्टन्सिंगचे धडे…
करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, खबरदारीचा उपाय म्हणून बांधकाम साईटवर काम करणाऱ्या कामगारांना दैनंदिन जीवनात फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे तसेच वारंवार हात धुण्याचे महत्त्व बांधकाम कामगार सेनेकडून समजावून दिले जात आहे. त्याकरिता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष साईटला भेट दिली जात आहे.
लॉकडाऊनच्या काळात कुशल मनुष्यबळाची कमतरता ओळखून, या महिलांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने ऑन जॉब ट्रेनिंगची संकल्पना मांडली. त्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या महिलांची वाढलेली हजेरी पाहुन अनेक महिला कामगार अशा प्रशिक्षणाची मागणी करु लागल्या आहेत. या उपक्रमातून पुणे जिल्ह्यातील 500 महिला कामगारांना प्रशिक्षित करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे.
– जयंत शिंदे, अध्यक्ष, बांधकाम कामगार सेना