नवी दिल्ली : जगातील जीवघेण्या विषाणूवरून अमेरिकेने चीनला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. रोज नवनवीन आरोप करण्यात येत आहेत. त्यात आता अमेरिकेने पुन्हा एकदा चीनवर निशाणा साधला आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (सीसीपी) त्यांच्या शेजारी राष्ट्रांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही वाईट आहे. तसेच सरकार कमकुवत करण्यासाठी सायबर मोहिमेद्वारे ते अमेरिका आणि युरोपमध्ये खोटा प्रचार करत आहे. तसेच चीन विकसनशील देशांना चीनवरील अवलंबत्व वाढवून आणि कर्जाच्या ओझ्याखाली ठेवण्याचे काम करत असल्याचे मत अमेरिकेचे पररराष्ट्र मंत्री माईक पॉम्पियो यांनी व्यक्त केले. तसेच चिनी सैन्यामुळेच भारत चीन सीमेवर तणावर निर्माण झाल्याचे ते म्हणाले.
चिनी सैन्य जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतासोबत तणाव निर्माण करण्यात गुंतलं आहे. दक्षिण चीन समुद्रात चीन आपल्या क्षेत्राचा अवैधरित्या विस्तार करत आहे, असेही पॉम्पियो म्हणाले. करोना व्हायरसबद्दलंही चीन खोटं बोलला. तसंच त्यांनी हा व्हायरस जगातील सर्व ठिकाणी पसरू दिला. तसंच आपला हा कट लपवण्यासाठी चीननं जागतिक आरोग्य संघटनेवर दबाव आणला, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
शुक्रवारी त्यांनी ‘कोपेनहेगन डेमोक्रेसी समिट २०२०’ मध्ये ‘युरोप आणि चीनची आव्हानं’ या विषयावर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केलं. त्यावेळी ते बोलत होते. चीनच्या कम्युनिस्ट विचारधारेत बदल करून चीनमधील लोकांचं जीवनमान उंचावू शकू असा पश्चिमी देशांना विश्वास होता. परंतु कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (सीसीपी) आपल्यासोबत उत्तम संबंध असल्याचा बनाव करत फायदा घेत आहे,” असंही पॉम्पियो म्हणाले.