अहमदाबाद – गुजरात मध्ये करोनाच्या सहा नवीन केसेस आढळून आल्या असून त्यामुळे या राज्यातील करोना बाधितांची संख्या आता तेरावर गेली आहे. मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी ही माहिती दिली. यातील बारा जण विदेशातून प्रवास करून आले आहेत तर एक जण दिल्ली आणि जयपुरच्या दौऱ्यावरून परतला आहे असे त्यांनी सांगितले.
या एकूण तेरा रूग्णांपैकी चार जण अहमदाबाद शहरातील आहेत तर एक जण अहमदाबाद ग्रामीण भागातील आहे. सुरत आणि बडोद्यात प्रत्येकी तीन रूग्ण आहेत. तर राजकोट आणि गांधीनगर मध्ये प्रत्येकी एक रूग्ण आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की गुजरात मधील 1200 खाटांचे सुपरस्पेशॅलिटी सरकारी हॉस्पीटल केवळ करोना बाधित रूग्णांसाठीच राखीव ठेवण्यात येणार आहे. अशाच स्वरूपाची सोय राजकोट, बडोदा आणि सुरत येथे करण्यात येत आहे असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी बडोद्याच्या एसएसजी रूग्णालयात जाऊन तेथील स्थितीचा आढावा घेतला.