लोणी काळभोर -कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील घोरपडेवस्ती परिसरात एकाच कुटुंबातील 6 सदस्य करोना बाधित असल्याचे आढळून आले असून या गावातील करोना बाधित रुग्णांची संख्या 18 वर पोचली आहे. अशी माहिती लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. जे. जाधव यांनी दिली.
वरील करोना बाधित कुटुंबातील काही सदस्य मागील तीन दिवसात अनेकांच्या संपर्कात आल्याचे निष्पन्न झाले आहे. या कुटुंबांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची माहिती गोळा केली जात आहे. या कुटुंबातील एका सदस्याला सर्दी व खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने, त्याच्या स्वॅबची तपासणी लोणी काळभोर येथील कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात आली होती. यात तो बाधित आला.
कुटुंबातील पाचही सदस्यांचे स्वॅब तपासले असता तेही बाधित निघाले. हे सदस्य घोरपडे वस्ती परिसरात वारंवार फिरत असल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व नागरिकांची माहिती गोळा केली जात आहे.