राजगुरूनगर -राक्षेवाडीत करोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या राजगुरूनगर शहरातील 6 व्यक्तींचा करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली. सहाही व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आल्याने राजगुरूनगर नगर शहरात पसरलेली घबराट आणि अफवा आता थांबणार आहेत. तर राक्षेवाडीतील करोनाबाधिताच्या दोन मुलांचा अहवालही निगेटिव्ह आला असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
राक्षेवाडीतील करोनाबाधित महिला व्यक्तीच्या कंपनीत काम करणाऱ्या व जवळून संपर्क आलेल्या 6 महिला राजगुरूनगर व राजगुरूनगर शहरालगत राहणाऱ्या होत्या. त्यांना तपासणीसाठी खेड आरोग्य विभागाने दोन दिवसांपूर्वी पुणे येथे पाठविण्यात आले होते. या सर्वांची स्वॅब टेस्ट घेण्यात आली मंगळवारी (दि. 19) त्यांच्या अहवाल निगेटिव्ह आला. दरम्यान, या सहा व्यक्तींना आरोग्य विभागाने तपासणीसाठी नेल्याने राजगुरूनगर शहरात मोठ्या अफवा आणि खळबळ उडाली होती. सोशल मीडियावर मोठ्या अफवा पसरविल्या जात होत्या. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये मोठी धडकी भरली होती.
दरम्यान, राक्षेवाडीतील एका इमारतीमधील एका कुटुंबातील 5 जणांना करोना झाला आहे. कुटुंबातील एकाला सुरुवातीला करोना झाल्याचे निष्पन्न झाले होते त्यानंतर त्याच्या कुटुंबातील इतर तीन, त्याच्या बहिणीच्या कुटुंबातील चार आणि त्यांच्याशी संपर्क आलेले इतर तीन आशा 11 जणांच्या स्वॅब टेस्ट करण्यात आल्या होत्या. त्यापैकी बाधित कुटुंबातील 5 जण पॉझिटिव्ह आले होते. दोन मुलांच्या स्वब तपासणी अहवाल येणे बाकी होते ते मंगळवारी निगेटिव्ह आल्याने राक्षेवाडी ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला.
करोनावर मात करण्यासाठी प्रशासन काळजी घेत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. शासकीय माहिती आल्याशिवाय सोशल मीडियावर चर्चा अफवा पसरू नये. नागरिकांनी स्वतःची कुटुंबाची काळजी घ्यावी, शासकीय सूचना व नियमांचे कडक पालन करावे.
– अंकुश राक्षे,
सभापती, खेड पंचायत समिती