सातारा – जिल्ह्यात सार्वत्रिक निवडणूक लागलेल्या 133 ग्रामपंचायत तसेच पोटनिवडणुकीसाठी दुसऱ्या दिवशी कराड तालुक्यातून सहा जणांचे अर्ज दाखल झाले. सातारा, कोरेगाव, वाई, महाबळेश्वर, जावळी, फलटण, माण तसेच पाटण तालुक्यातून एकही अर्ज दाखल झाला नाही.
राज्य निवडणूक आयोगाने जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच मागील निवडणुकीत एकही नाम निर्देशन पत्र दाखल न झालेल्या आणि विघटित झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक वरिष्ठ पदांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये सातारा पाच, कराड 16, पाटण 26, कोरेगाव 13, वाई 16, महाबळेश्वर 17, जावळी 24, फलटण व माण प्रत्येकी चार, खटाव तालुक्यातील आठ अशा 133 ग्रामपंचायतमधील 412 वार्डमध्ये एक हजार 13 सदस्य पदासाठी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या टप्प्यात खंडाळा तालुका वगळता इतर तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.
अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी कराड तालुक्यात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी चार तर पोटनिवडणुकीसाठी दोन अर्ज दाखल झाले आहेत. ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ऑनलाईन तर पोट निवडणुकीसाठी ऑफलाईन अर्ज घेण्यात येत आहेत. दरम्यान सर्वच तालुक्यांमध्ये पोटनिवडणूक जाहीर झालेल्या 172 ग्रामपंचायतीमधील 125 वार्डामध्ये राजकीय धुमशान सुरू झाले आहे. 259 सदस्य पदासाठी व 14 थेट सरपंच पदासाठी या निवडणुका होत आहेत. गावा गावांमध्ये पॅनेल तयार झाली आहेत. पॅनेल प्रमुखांकडून उमेदवारांचा शोध घेण्यात येत आहे. येत्या चार- पाच दिवसात मोठ्या संख्येने अर्ज दाखल होतील अशी अपेक्षा आहे.
सोमवार, दि. 16 ऑक्टोबरपासून सकाळी 11 ते तीन या वेळेत अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दि. 23 रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून आलेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी केली जाणार आहे. दि. 25 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्या दिवशी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार असून चिन्ह वाटप होणार आहे. रविवार, दि. पाच नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात ते साडेपाच या वेळेत मतदान होणार आहे. सोमवार, दि. 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक शाखेतून देण्यात आली.
ढवळेवाडी (आसू)ची निवडणूक रद्द
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दुसऱ्या दिवशी सहा अर्जफलटण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज दुसऱ्या दिवशीही कोणताच उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. दरम्यान, ढवळेवाडी (आसू) ची अधिसूचना निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाली नसल्याने तूर्तास रद्द झाली असल्याचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी स्पष्ट केले. फलटण तालुक्यातील उपळवे, दर्याचीवाडी, सावंतवाडी, जाधवनगर अशा चार ग्रामपंचायतींच्या निवडणूका थेट सरपंचपदासह तर मलवडी, पिराचीवाडी, होळ, मुरुम, निरगुडी, विंचुर्णी, सासकल, गोळेवाडी आणि परहर बुद्रूक अशा नऊ ग्रामपंचायतींमध्ये प्रत्येकी एक जागेसाठी 5 नोव्हेंबरला निवडणूक होत आहे.