रेडा -इंदापूर पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार इंदापूर लगतच्या बाह्यवळण रस्त्याला सापळा रचून 6 लाख 55 हजार रुपये किमतीचा 32 किलो गांजा जप्त केला आहे.
इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी (दि. 21) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास इंदापुर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर, सहायक पोलीस निरीक्षक गणेश लोकरे तसेच दहशतवाद विरोधी पथक पुणे ग्रामीण पथकाचे सहाय्यक फौजदार मोहिते, सहाय्यक फौजदार खरात पेट्रोलींग करीत असताना त्यांना वरील माहिती मिळाली.
इंदापूर-सोलापूर महामार्गाने दुचाकीवर दोन व्यक्ती गांजाची चोरून रात्री तस्करी करीत पुणे बाजूकडून सोलापुरकडे जाणार आहेत. अशी माहिती मिळताच इंदापूर पोलिसांनी बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून पोलिसांनी मोटारसायकलवर जाणाऱ्या दोन संशयितांना थांबवून विचारले असता त्यांच्याकडे 32 किलो गांजा मिळून आला.
त्यांना जागीच पकडून त्यांचे नाव व पत्ता विचारला असता त्यांनी फिरोज हवीब शेख ( वय 40, रा. विसापुर ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर) व विशाल रंगनाथ आढाव (वय 22, रा. रेवती पाढळी ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर) असे सांगीतले.
पोलिसांनी त्यांच्याकडील मालाची पाहणी केली असता 6 लाख 55 हजार रूपये किमतीचा 32 किलो गांजा मिळून आला. त्यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत सहाय्यक फौजदार अर्जुन मोहिते यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या गुन्हयाचा पुढील तपास पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते, बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश लोकरे करीत आहेत.