शिरूर -शिरूर तालुक्यातील 4 गावांत 6 करोना बाधित रुग्ण आढळले आहेत, तर रामलिंग येथील एका 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली. शिरूर तालुक्यातील शिरूर शहर 1, करंदी 1, तळेगाव ढमढेरे 3, तर्डोबाचीवाडी 1, असे सहा करोना बाधित रुग्ण आढळले आहेत.
शनिवारी (दि. 25) तपासणी करण्यात आलेल्या शिरूर शहरातील 12 जणांचे करोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर शहरातील दोघेजण करोनावर मात करत घरी परतले आहेत. शिरूर शहरातील भाजी बाजार येथील 53 वर्षीय पुरुषाला करोनाची लागण झाली आहे. तर संभाजी नगर हुडको वसाहत येथील 55 वर्षीय पुरुषाने तर सैनिक सोसायटी येथील 36 वर्षीय वकिलाने करोनावर मात केली आहे.
शहरातील डंबे नाला येथील मृत पुरुषाच्या घरातील नातेवाईक व सोनार येथील करोना पॉझिटिव्ह महिलेच्या नातेवाईक, भाजीबाजार येथील करोना पॉझिटिव्ह पुरुषाचे नातेवाइक असे मिळून 12 जणांचे करोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
शिरूर शहरात सैनिक सोसायटी, डंबे नाला कामाठीपुरा, शिवाजी हौसिंग सोसायटी, सुभाष चौक, सरदार पेठ, लाटे आळी, जोशीवाडी, प्रीतम प्रकाश नगर, भाजी बाजार, मुंबई बाजार, हुडको कॉलनी, श्री हाइट्स, सय्यद नगर, कुंभार आळी, रेव्हेन्यु कॉलनी, बुरुडआळी या भागात 26 ठिकाणी करोना बाधित रुग्ण सापडल्याने हा परिसर प्रतिबंधीत क्षेत्र घोषित करण्यात आला आहे. तरी नागरिकांनी नियमांचे पालन करून काळजी घेण्याचे आवाहन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.