रुबी हॉल, पूना हॉस्पिटल, इनलॅक्स बुधराणी, जहांगीर, केईएम हॉस्पिटलचा समावेश
महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभ मिळणार
पुणे – करोनाग्रस्तांना मोफत उपचार मिळावेत, यासाठी शहरातील पाच बड्या रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना लागू करण्यात आली आहे. त्यामध्ये रुबी हॉल क्लिनिक, पूना हॉस्पिटल, इनलॅक्स बुधराणी हॉस्पिटल, जहांगीर तसेच केईएम हॉस्पिटलचा समावेश आहे. त्यातून बाधितांना मोफत उपचार मिळणार आहेत.
रुग्णाच्या खर्चाचे बिल वाढत असल्याने आणि बड्या रुग्णालयांमध्ये जीवनदायी आरोग्य योजना नसल्याने त्याचा आर्थिक फटका रुग्णांना सहन करावा लागत होता. अखेर धर्मादाय सहआयुक्त दिलीप देशमुख यांनी शहरातील प्रमुख बड्या रुग्णालयांच्या प्रतिनिधींसह महात्मा फुले योजनेच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घेतली. यावेळी उपायुक्त नवनाथ जगताप उपस्थित होते. त्या बैठकीत महात्मा फुले आरोग्य योजनेंतर्गत शहरातील पाच बड्या रुग्णालयांना समाविष्ट करून घेण्याचे योजनेच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले. त्यावेळी करोनाच्या साथीपर्यंतच ही योजना लागू राहील, अशा अटीवरच रुग्णालयांनी योजना राबविण्यास संमती दिली.
शहरात करोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटरच्या बेड्सचा तुटवडा निर्माण झाला आहे. दुसरीकडे, रुग्णालयांमधून रुग्णांचे बिल वाढत आहे. उपचाराचा खर्च रुग्णांना परवडत नसल्याचे दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर महात्मा फुले आरोग्य योजना शहरातील सर्व रुग्णालयांमध्ये लागू करण्यात यावी, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी रुग्णालयांना दिल्या होत्या. त्या सूचनेनंतर रुग्णालयांनी महात्मा फुले योजनेंच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता. त्यावेळी रुग्णालयांना योजनेंतर्गत समाविष्ट करण्याच्या मर्यादा संपुष्टात आल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे बहुतांश रुग्णालये “वेटिंग’वर ठेवण्यात आले होते.