नवी दिल्ली – अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूची चौकशी सीबीआय, एनआयए, ईडी आणि प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या विशेष तपास पथकाने करावी, अशी मागणी भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. चित्रपट उद्योगातील दैनंदिन व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी वेगवेगळ्या कायदेशीर प्रक्रियांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक कायदेशीर चौकट तातडीने आवश्यक आहे, असेही दुबे यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटले आहे.
माफियांशी संबंधित असलेल्या लोकांकडून फिल्म इंडस्ट्री नियंत्रित केली जाते आहे. चित्रपट उद्योगात अवैध पैशाची गुंतवणूक केली जात असल्याचा आरोप दुबे यांनी केला आहे. छोट्या शहरांतील प्रतिभावान कलाकारांना या माफियाशी संबंधित फिल्म इंडस्ट्रीमध्ये वाढू दिले जात नाही, असेही ते म्हणाले.
लहान शहरांमधून आलेले कोणीही नवोदित कलाकार फिल्म इंडस्ट्रीमध्ये तग धरू शकत नाही. जर सुशांत सिंह राजपूत सारख्या एखाद्या कलाकाराने आपला जम बसवण्याचा प्रयत्न केला तर माफियाशी संबंधित लोक त्याला त्रास देतात. त्याचे पर्यावसन या कलाकारांच्या मृत्यूमध्ये होते.
फिल्म इंडस्ट्री आणि कलाकारांचा मोठा परिणाम जनतेवर होत असतो. तर त्याचा नकारात्मक परिणाम लोकांवर व्हायला नको. अन्यथा समाज जगण्यास अयोग्य होईल, असेही दुबे यांनी म्हटले आहे. फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित आर्थिक व्यवहारांना नियंत्रित करण्यासाठी एक कायदेशीर चौकट निर्माण करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.