मुंबई : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. निमंत्रण पत्रिकेवरील नावावरून दोन्ही बहीण-भावामध्ये आता शाब्दिक युद्ध सुरु झाले असल्याचे दिसत आहे. यावेळी, “मी बीड जिल्ह्याची बदनामी नाही, तर काळजी घेतली” अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना उत्तर दिले आहे.
बीड जिल्ह्यात काल विकासकामासंबंधी कार्यक्रम पार पडले. यावेळी धनंजय मुंडे यांनी काल जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे लोकार्पण केले, तर सायंकाळी बीड तालुक्यातील बेलेश्वरमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमादरम्यान पंकजा मुंडे यांनी, “पाच वर्ष आम्ही सत्तेत होतो. प्रत्येक कोनशिला आणि निमंत्रण पत्रिकेवर त्यांचं नाव असायचं, पण आज त्यांनी मोठेपणा दाखवला नाही. मात्र आम्ही नक्की दाखवू,” असे म्हटले.
दरम्यान काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांनी ‘बीड जिल्ह्याला बदनाम करू नका?’ अशी टीका भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर केली होती. यावर प्रीतम मुंडे यांनी प्रत्युत्तर देत खासदार प्रीतम मुंडे यांनी तुमच्याच नाकर्तेपणामुळे जिल्ह्याची बदनामी झाली असल्याचे म्हटले होते. यानंतर धनंजय मुंडे यांनी जाहीर आव्हानच दिले होते.