पुण्यातील राष्ट्रवादीच्या समर्थकांमध्ये संभ्रम
कोणाची बाजू घ्यावी, याविषयी गोंधळ
पुणे – राज्यात एका रात्रीत सत्तासमीकरण बदल्यानंतर आणि सकाळी शपथविधीचा बॉम्ब फुटल्यानंतर पुण्यातही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात खळबळ उडाली. राष्ट्रवादीच्या छत्राखाली असलेल्या साहेब आणि दादा समर्थकांमध्ये एकदमच गोंधळ उडाला. आता कोणाची बाजू घ्यायची याविषयीही त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी पक्षाच्या बैठकीच्या नावाखाली त्यांचा मोबाइल बंद करून ठेवला, तर अन्य वेळी टीव्ही आणि अन्य प्रसिद्धीमाध्यमांवर कायमच पुढे-पुढे करणाऱ्या पक्ष प्रवक्त्यांचे मोबाइलही “नॉट रिचेबल’ लागले.
पुणे हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळवला होता. त्यानंतर यंदाच्या 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने दोन जागा आपल्या कब्जात करण्यात यश मिळवले. त्यावेळी अजित पवारांनी भाजपच्या विरोधात अक्षरश: दंड थोपटले. मात्र, आता त्यांनी भाजपची साथ देण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. सकाळपासून सुरू असलेल्या या घडामोडींनी काय प्रतिक्रिया द्यावी हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना समजलेच नाही. त्यामुळे ते गोंधळेल्या स्थितीत असल्याचे पहायला मिळत आहे.
अजित पवारांनी बोलावून घेतल्यानंतर पक्षनेत्याचा आदेश म्हणून आमदार त्यांच्याबरोबर गेले. अजित पवारांचे मन वळवण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत. आधीच आपले मत कोणाच्या बाजूने आहे हे जाहीर केले तर पंचाईत होईल या विचाराने त्यांनी “वेट ऍन्ड वॉच’ हे धोरण ठरवले आहे. आमदार सुनील टिंगरे यांनी पक्षाच्या बैठकीलाही त्यांनी हजेरी लावली असून, त्यांनीही निर्णय घेण्याआधी चाचपणी सुरू केली आहे. मिळालेल्या या सकाळी सकाळीच मिळालेल्या या “शॉक’ मधून बाहेर पडल्यानंतर या आमदारांची भूमिका निर्णायकी असणार आहे.