रेल्वे आणि पीएमपीची संयुक्त सेवा पुरवणार
मेट्रोच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाच्या हालचाली
पुणे – रेल्वे, मेट्रो आणि पीएमपी बसेस या सेवा प्रवाशांना एकत्रितपणे उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे प्रशासन कार्यरत आहे. त्यामुळेच मेट्रो प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांसाठी संयुक्त सुविधा उभारण्याचा विचार प्रशासनाकडून केला जात आहे. त्यामुळे प्रवासाची विविध साधने एकमेकांशी संलग्न होणार असल्याने नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे.
वनाझ ते रामवाडी या मेट्रो मार्गावरील मेट्रो स्थानक ताडिवाला रोड येथे होणार आहे. तर रेल्वेचे दुसऱ्या क्रमांकाचे “एक्झिट गेट’ आणि सरकते जिने (एस्केलेटर) देखील ताडिवाला रोडवर आहे. यामुळे मेट्रो स्थानकाच्या परिसरातून थेट रेल्वे स्थानकात येण्यासाठी पादचारी पूल (फूट ओव्हर ब्रीज) उभारल्यास प्रवाशांना ये-जा करणे सोपे जाणार आहे. याबाबत वाहतूक विभागाशी चर्चा करण्यात येणार आहे.
लांब पल्ल्याच्या अनेक रेल्वे गाड्या रात्री पुणे स्थानकात दाखल होतात. त्यामुळे पुढे इच्छित स्थळी जाण्यासाठी प्रवाशांची गैरसोय होते. रिक्षाचालकदेखील वाढीव दराने भाडे आकारतात. प्रवाशांच्या या समस्येवर रेल्वे प्रशासनाने तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रशासनाने पीएमपी शी देखील संपर्क साधला असून, पीएमपीने रात्रसेवा सुरू करण्याची विनंती केली आहे.
पीएमपी बससेवा प्रायोगिक तत्वावर सुरू
रेल्वे प्रवाशांना स्थानकातून इच्छितस्थळी जाण्यासाठी मुख्य रस्ता ओलांडावा लागतो. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण होते. या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे स्थानकासमोरील 4 नंबर लेन पीएमपी बससाठी खुली करण्यात आली आहे. रेल्वे स्टेशन आवारातून आता पीएमपीच्या बसमार्फत प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. प्रायोगिक तत्त्वावर कात्रज, स्वारगेट, कोथरूड, निगडी, आळंदी, वाघोली, तळेगाव साठी बसेस धावत आहेत.
प्रवाशांना अवजड साहित्य, बॅग घेऊन प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सरकते जिने आणि फूट ओव्हर ब्रीजची व्यवस्था करण्यात आली आहे. याप्रमाणे प्रवाशांना मेट्रो, रेल्वे आणि पीएमपी बसेसने शहरांतर्गत सहज प्रवास करता यावा, यासाठी “ट्रान्सपोर्ट हब’ साठी प्रयत्न सुरू आहेत. विविध विभागीय अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करण्यात येत आहे.
– मिलिंद देऊस्कर, विभागीय रेल्वे प्रबंधक