पिंपरी-चिंचवड शहरात साध्या पद्धतीने छठपूजा उत्सव

पर्यावरण संवर्धनाचा दिला जातो संदेश

निगडी – करोना महामारीमुळे यावर्षी सर्व सण, उत्सव साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले. करोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील उत्तर भारतीय नागरिकांनी आपल्या घरीच साध्या पद्धतीने छठपूजा केली.

दरवर्षी दिवाळी सणानंतर सहा दिवसांनी साजरा होणारा उत्तर भारतीय नागरिकांचा छठपूजा उत्सव मोठ्या आनंदी व उत्साही वातावरणात साजरा केला जातो. छठपूजेसाठी महापालिका प्रशासनाकडून नदी घाटांवर मोठी तयारी करण्यात येते. परंतु यावर्षी सर्वच सणांवर व उत्सांवर करोनाचे सावट असल्याने साध्या पद्धतीने साजरे करण्यात येत आहेत.

विश्‍व श्रीराम सेनेचे अध्यक्ष लालबाबू गुप्ता म्हणाले की, छठपूजा हे एक महापर्व असून, उत्तर भारतीय बांधवांचा मोठा सण आहे. हे व्रत मनुष्यास निसर्गाच्या सान्निध्यात नेणारे आणि जल, सूर्य, कृषी यांचे महत्त्व पटवून देणारे आहे. या उत्सवाच्या निमित्ताने नदी स्वच्छता केली जाते. गंगा महाआरती या सणाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीत साजरे होणारे सर्व सण, उत्सव जोडले जावेत, सर्व जाती, धर्मामध्ये प्रेम, सद्‌भाव, वाढावा. सर्वामध्ये बंधुत्वाची भावना वाढीस लागावी. सर्वांनी एकत्र येऊन सण, उत्सव साजरे करावेत या उद्देशाने हा सण साजरा केला जातो. निसर्ग व मानव यांच्या एकता साधली जाते.

हा एक हिंदू सण असून छठ मातेच्या पूजेची सुरुवात चतुर्थीला नहाय खायने होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी खराना ऊस, रस, गुळ, खीर, पुरी प्रसाद म्हणून देतात. षष्टीला संध्याकाळी सूर्यास्ता वेळी सूर्याला अर्ध्य वाहतात. सकाळी दूध, जल अर्पण केले जाते. सूर्याच्या उपासनेसाठी हा पर्व साजरा केला जातो. नद्या व सूर्य आपल्याला जीवन देतात.

यावर्षी करोनामुळे नदी घाटावर छठपूजा साजरी न करता घरीच सुरक्षित अंतर राखून साजरी करण्यात येत आहे. श्रीराम सेनेचे अध्यक्ष लालबाबू गुप्ता यांच्या घरी छठपूजा साजरी करण्यासाठी प्रमोद गुप्ता, शाम गुप्ता, विनोद गुप्ता, रोहित प्रसाद, राजकुमार गुप्ता, इम्तियाज शेख, अक्रम शेख व महिला भाविक उपस्थित होत्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.