कोणताही राष्ट्रीय पक्ष विना अध्यक्ष एवढ्या मोठ्या कालावधीसाठी काम कसा करू शकतो?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पुन्हा केली नाराजी व्यक्त

नवी दिल्ली : बिहार निवडणुकांमध्ये महाआघाडीचा झालेला पराभवामुळे अनेक पक्षांकडून काँग्रेसवर टीका करण्यात आली. परंतु जेव्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी त्याच गोष्टी सांगितल्या आणि पक्षनेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तेव्हा पक्षातील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. आता काँग्रेसच्या काही नेत्यांनी पुन्हा एकदा सिब्बल यांच्यावर पलटवार केला आहे. दरम्यान, आपण गांधी कुटुंबीयांविरोधात नसल्याची प्रतिक्रिया सिब्बल यांनी दिली.तसेच कोणताही राष्ट्रीय पक्ष अध्यक्षा विना काम करण्यासाठी कसा राहू शकतो असा सवाल करत नाराजी व्यक्त केली आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे.

कपिल सिब्बल यांनी यावेळी, “प्रश्न हा आहे की राहुल गांधी यांनी दीड वर्षांपूर्वी आपल्याला काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहायचे नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच त्या पदी गांधी कुटुंबातील कोणतीही व्यक्ती असू नये असंही ते म्हणाले होते. या गोष्टीला दीड वर्ष उलटल्यानंतरही मी हे विचारू इच्छितो की कोणताही राष्ट्रीय पक्ष विना अध्यक्ष एवढ्या मोठ्या कालावधीसाठी काम कसा करू शकतो. मी पक्षाच्या आत यावर आवाज उचलला होता. आम्ही ऑगस्ट महिन्यात पत्रही लिहिलं होतं. परंतु आमच्याशी कोणीही चर्चा केली नाही. दीड वर्षांनंतरही आमच्या पक्षाला अध्यक्ष नाही. कार्यकर्त्यांनी आपल्या समस्या कोणाकडे मांडाव्या?,” असा सवाल त्यांनी केला.

“एखाद्या राष्ट्रीय पक्षासाठी ही कठिण परिस्थिती आहे आणि ती जेव्हा आम्ही एक जुना पक्ष आहोत. मी कोणाच्याही क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही. फक्त पक्षात निवडणुका व्हाव्यात एवढंच म्हणणं आहे. जर आम्ही संघटनेच्या निवडणुका घेतल्या नाही तर आम्हाला जो हवा तसा निकाल इतर ठिकाणी कासा मिळेल. हेच आम्ही पत्रातही नमूद केलं होतं,” असं ते म्हणाले. “पक्षाचा कोणीही अध्यक्ष नाही. आम्ही ऑगस्ट २०२० मध्ये जे पत्र लिहिलं ते आमचं तिसरं पत्र होतं. गुलाम नबी आझाद यांनी त्यांपूर्वी दोन वेळा पत्र लिहिलं होतं. परंतु त्यानंतरही आमच्याशी कोणी चर्चा केली नाही. म्हणूनच मला जेव्हा संधी मिळाली तेव्हा मी माझं म्हणणं मांडलं,” असे सिब्बल म्हणाले.

यावेळी त्यांनी अधीर रंजन चौधरी यांच्या टीकेवरही भाष्य केले. “मला त्यांच्या वक्तव्यांवर काहीही बोलायचे नाही. पश्चिम बंगालमध्ये निवडणुका आहेत. त्यांनी आपली पूर्ण क्षमता त्या ठिकाणी वापरली पाहिजे. निवडणुकांदरम्या पक्ष स्टार कॅम्पेनर्सची यादी जाहीर करू शकतो हे त्यांना माहित हवं. जर मला पक्षानं बिहारमध्ये जाऊन प्रचार करण्यास सांगितला असता तर तो मी केला असता. परंतु माझं नाव स्टार कॅम्पेनर्सच्या यादीत नव्हतं. त्यांच्यासारखा मोठा नेता आणि काँग्रेसच्या संसदीय दलातील एक नेता एवढी मोठी बाब समजू शकत नाही याचं आश्चर्य आहे. त्यांनी सध्या पश्चिम बंगालच्या निवडणुकांवर आपलं लक्ष केंद्रीत करावं असा मी त्यांना सल्ला देईन,” असेही सिब्बल म्हणाले. “जर पक्ष निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी करत नसेल तर माझ्या भावनाही दुखावल्या जातात. मीदेखील एक काँग्रेस कार्यकर्ता आहे. मी लाखो कार्यकर्त्यांचा आवाज उचलत आहे. मी गांधी कुटुंबीयांवर कोणतीही टीका करत नाही. मी पक्षाची लोकशाही व्यवस्था वाढवण्याबद्दल बोलत आहे,” असेही ते म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.