पुणे जिल्हा: बारामतीत अनलॉक प्रक्रियेत संसर्गाची भर?

करोनाबाधित वाढल्याने प्रशासन चिंतेत

बारामती- बारामतीत 32 करोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाचीही चिंता वाढली आहे. राज्य शासनाने अनलॉक प्रक्रियेत आता तर सोमवारपासून नववी ते बारावीपर्यंतच्या वर्गांना परवानगी दिली असल्याने गर्दीत आणखी भरच पडणार आहे. 

बारामतीत आरटीपीसीआर तपासणीत रुग्णसंख्या कमी असली तरी रॅपिड अँटीजेनमध्ये पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. बारामतीत 393 आरटीपीसीआर तपासण्या झाल्या, त्यात सात जण पॉझिटीव्ह होते, त्याचवेळेस 262 रॅपिड तपासण्यात 21 जण पॉझिटिव्ह आढळले. यामुळे बारामतीत पुन्हा रुग्ण संख्या हळूहळू वाढत चालली आहे असे विदारक चित्र आहे.

बारामतीत आजपर्यंत 4556 रुग्ण बाधित झाले होते, त्यापैकी 4241 रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहे. आजपर्यंत 123 रुग्णांचा बारामतीत मृत्यू झाला आहे. मधल्या काळात रुग्णसंख्या कमी होत गेली होती. आता पुन्हा आकडा तीसहून अधिक होऊ लागला आहे, त्यामुळे प्रशासनही सतर्क झाले आहे.

प्रत्येक दुकानात सॅनिटायझर्सची सुविधा, ग्राहकांचे नाव पत्ता, मोबाइल नंबर लिहून घेणे, नऊ वाजता दुकान बंद करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे या नियमांचे बारामतीत दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर तीन तेरा वाजले आहेत. अनेक ठिकाणी सर्रासपणे नियमांचे उल्लंघन होत आहे. गर्दीमुळे आता करोना इतिहासजमा झाल्याच्या थाटातच बारामतीकर वावरत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत आहे.

दुकानदारांसह ग्राहकांनीही मास्कचा वापर करणे, सॅनिटायझर्सचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे या बाबी गरजेच्या आहेत. करोनाच्या बचावासाठी प्रत्येकाने काळजी घेणे अनिवार्य आहे.
-डॉ. मनोज खोमणे,
तालुका आरोग्य अधिकारी, बारामती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.