पुणे – श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठातील शासन मान्यताप्राप्त ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघटननेने’ सन 2022 मध्ये 25 व्या वर्षात पदार्पण केले आहे. संघटनेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य राखून संघटनेच्या पूर्वनियोजित सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांतर्गत श्री गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्ट, कर्जत रोड, खारवाई, बदलापूर (पूर्व) या सेवाभावी संस्थेतील अनाथ, गरजू मुला-मुलींच्या विकासाच्या उद्देशाने व दुर्बल व दिव्यांग मुला-मुलींना इतरांसारख्या जीवन जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी सदर संस्थेला संघटनेच्या माध्यमातून आर्थिक व अन्नधान्याच्या स्वरूपात मदत करण्यात आली.
समाजाच्या विकासात खारीचा वाटा उचलत संघटनेने अन्नधान्य (तांदूळ ५० किलो, गहू- ५० किलो, मुगडाळ १० किलो, तूरडाळ १० किलो, साखर २५ किलो, रवा १० किलो) ५० किलो धान्य तोलण्यासाठी वजन काटा, तसेच सदर संस्थेतील अनाथ व गरजू मुला-मुलींना मागणीविरुद्ध दिपावलीच्या शोभेच्या वस्तू (तोरण, दरवाजा लटकन, पणती, आकाश कंदील, झुंबर) स्वहस्ते बनवून त्या वस्तुंच्या विक्रीच्या नफ्यातून विध्यार्थ्याना इतरांप्रमाणे दीपावली साजरी करता यावी या उद्दात हेतूने आवश्यक त्या वस्तूंच्या कच्या मालाची खरेदीसाठी रु. 5 हजाराचा धनादेश “गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्ट” या नावाने देऊन गरजू मुलांना आर्थिक सहाय्य करण्यात आले.
यावेळी संस्थेचे व्यवस्थापक प्रशांत बडेकर यांनी संस्थेचा इतिहास सांगितल्यानंतर संस्थेतील मुलांसमवेत मनोसोक्त गप्पा मारतांना विध्यार्थ्यांची जीवनकथा व प्राथमिक गरजा जाणून घेतल्या.
संघटनेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित उपक्रमांतर्गत 24 सप्टेंबर 2022 रोजी संघटनेचे सहसचिव समीर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली, संघटनेचे सभासद रतनलाल जैसवार, भरत भांडकोळी, श्रीकांत साळेकर व संजय धुरी यांनी संस्थेला भेट देऊन संघटनेमार्फत गृहउपयोगी आवश्यक वस्तू श्री गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्टचे व्यवस्थापक प्रशांत बडेकर यांच्या हस्ते सुपूर्द केल्यानंतर त्यांनी प्रेमाचे प्रतीक म्हणून “वटवृक्षाच्या छायेत” हे पुस्तक देऊन संघटनेच्या प्रतिनिधींचा सन्मान केला.