सावली गावात श्रमदानातून हजारो रुपयांची कामे मार्गी
मेढा – जावळी तालुक्यातील सावली गावाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या एक जानेवारी रोजी होणारा वाढदिवस सामाजिक उपक्रमांचा पंधरावडा महोत्सव म्हणून प्रत्येक दिवस साजरा करत असून यामध्ये गावामध्ये विविध विधायक उपक्रम राबवून शेकडो हातांच्या श्रमदानातून हजारो रुपयांची कामे मार्गी लागली आहेत. आरोग्य शिबीर, पशुधन शिबीर, निबंध, वक्तृत्व स्पर्धा, वनराई बंधारे, श्रमदान शिबीर, वृक्ष लागवडीसाठी नियोजन आदी कामे करून सावली गावाने वाढदिवस महोत्सव म्हणून साजरा केला आहे. याबदल सावली गावचे सर्वत्र कौतुक होत आहे .
या विविध उपक्रमात पिरामल फौंडेशन यांच्यावतीने शुगर व रक्तदाबाची मोफत तपासणी करून मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र केळघर व उपकेंद्र गवडी यांच्यावतीने गावातील विविध रुग्णांची तपासणी व उपचार करून त्यांना औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. पशु वैद्यकिय दवाखाना मेढा अंतर्गत शिबीर घेवून गावामध्ये पशुधनाची मोफत आरोग्यतपासणी करून गावांमध्ये घरोघरी जावून कोंबड्यांचे मोफत लसीकरण करण्यात आले. शाळांमध्ये निबंध व वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या तसेच गावाची वेणानदी लगतच्या विहीर परीसर व वेण्णा नदी पात्राच्या तीरावर श्रमदान करण्यात आले.
सकाळी 8 वाजल्यापासून सायंकाळी 7 वा. पर्यंत सलग 11 तास श्रमदान करण्यात आले. यामध्ये प्रारंभी नदीलगतच्या विहीर परीसर व नदीपात्रा लगतच्या परिसरातील भवस, झुडपे, गवत काढण्यात आले. मोटारघराचा निघालेला पत्रा सुस्थितीत बसविण्यात आला.विहिरीच्या अस्ताव्यस्त केबल सुस्थितीत बांधण्यात आल्या. वेण्णामाई ओटी भरण विधिवत पद्धतीने झाले. वेण्णामाई व गंगेला महानैवेद्य झाल्यानंतर सर्व श्रमदात्यांना महाप्रसाद वाटप करण्यात आले.
यावेळी आलेल्या अधिकारी बॅक अधिकारी, आरोग्य, पशुधन विभाग, तसेच इतर विभागातील अधिकारी यांनी विविध योजनांची माहिती दिली.अयोध्येहून आलेला अक्षदा मंगल कलशाचे रथातून संपुर्ण गावातून मिरवणुक काढून दर्शन सोहळा झाला.
श्रमदान करुन ज्ञानदेव रांजणे यांना शुभेच्छा
आगामी पाणी टंचाई निवारण्यासाठी नदीपात्रात दोन वनराई बंधारे बांधण्यात आले. लाखो लीटर पाणी साठवण सुरु झाली.स्मशानभूमी लगत निवार्यासाठी सात वर्षाचे जांभळीचे झाड नवीन तंत्रज्ञानानुसार लावून प्रारंभ करून अशी वृक्षलागवड यशस्वी होते का याचे प्रत्यक्ष कार्य सुरु केले.स्मशानभूमीच्या जागेतील अडचणीची झाडे झुडपे काढून सफाई करण्यात आली. स्मशानभूमीच्या चारही बाजूनी वृक्षलागवड करण्यासाठी खड्डे काढून निर्जंतुकीकरणासाठी मोकळे हलवून ठेवले. सावडण्याच्या विधी एक खोल असे अस्थी व रक्षा विसर्जनासाठी आयताकृती ठिकाण निर्माल्य निर्माण करण्यात आले.या निर्माल्यातील अस्थी व रक्षा यांचा विधीनंतर येथे लावण्यात येणार्या वृक्षाला खत म्हणून वापर होणार असून 100 पेक्षा अधिक जणांचा श्रमदानात सहभाग घेतला व ज्ञानदेव रांजणे यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.
आज मोफत नेत्रतपासणी शिबीर
सावली या ठिकाणी उद्या सोमवारी नववर्षाच्या प्रारंभी एक जानेवारी 2024 रोजी सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत भव्य मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर होणार आहे. डीसीसी बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सरपंच विजय सपकाळ यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत सावली अजिंक्य मंडळ सावली व ग्रामस्थ मंडळ सावली यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. जावळी तालुक्यातील जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन उपसरपंच बाबुराव भिलारे व अजिंक्य नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष संदीप मस्कर यांनी केले आहे.